आरटीओ कार्यालयात एजंटांना प्रवेशबंदी
By admin | Published: January 18, 2015 12:26 AM2015-01-18T00:26:20+5:302015-01-18T00:29:17+5:30
दशरथ वाघोले : नागरिकांनी थेट यावे
सांगली : सर्वसामान्यांची होणारी लूट थांबविण्यासाठी आजपासून (शनिवार) उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) दशरथ वाघोले यांनी कार्यालयात एजंटांना प्रवेश बंदी केली आहे. कार्यालयाच्या कोणत्याही कामात हस्तक्षेप खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान, नागरिकांनीही कोणतेही काम असो, त्यांनी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन वाघोले यांनी केले आहे.
परिवहन आयुक्तांनी चार दिवसांपूर्वी आरटीओ कार्यालयाच्या आवारातील एजंटांना हटवा, त्यांचा कोणत्याही कामात हस्तक्षेप करून घेऊ नका, असा आदेश राज्यातील सर्व आरटीओंना दिला होता. या पार्श्वभूमीवर वाघोले यांनी याचा आज, शनिवार सकाळी आढावा घेतला. कार्यालयाच्या आवारात किती एजंट आहेत, यातील अधिकृत किती, याची त्यांनी माहिती घेतली. त्यावेळी त्यांना केवळ चारच एजंट मोटार ड्रायव्हींग स्कूलच्या निमित्ताने अधिकृत असल्याची माहिती मिळाली. यामुळे त्यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना एजंटांना कार्यालयात प्रवेश बंदी देऊ नये, अशी सूचना केली. त्यांचा कोणत्याही कामात हस्तक्षेप खपवून घेऊ नका, असेही सांगितले. (प्रतिनिधी)