ऊस बिलाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी आरग बंद

By admin | Published: December 2, 2014 10:29 PM2014-12-02T22:29:12+5:302014-12-02T23:27:32+5:30

ठिय्या आंदोलन : कारखान्याला दहा दिवसांची मुदत

Aggression is off for the second installment of sugarcane | ऊस बिलाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी आरग बंद

ऊस बिलाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी आरग बंद

Next

लिंगनूर : आज आरग (ता. मिरज) येथे मोहनराव शिंदे कारखाना प्रशासनाकडे विविध मागण्यांकरिता दाद मागत स्वाभिमानी शेतकरी संघटना, ऊस उत्पादक शेतकरी यांनी आक्रमक पवित्रा घेतला. गतवर्षीचा ऊस बिलाचा दुसरा ४५० रुपयांचा हप्ता द्यावा, यंदा २६०० चा दर जाहीर करावा या व अन्य मागण्यांसाठी आज आरग गाव बंद ठेवून कारखाना स्थळाच्या गेटवर ठिय्या मांडला. त्यानंतर दोनवेळा कारखाना प्रशासनासोबत बैठक अयशस्वी झाली. त्यानंतर दहा दिवसांची मुदत देऊन मुदतीत मागण्यांची पूर्ती करण्याचे ठरल्यानंतर आंदोलन स्थगित करीत तात्पुरता तोडगा काढण्यात आला.
मागील काही दिवसांपासून येथील ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांमधून मागीलवर्षीचा ऊस बिलाचा दुसरा हप्ता अद्याप दिला नसल्याने नाराजी निर्माण झाली आहे. अशात ऊस उत्पादक व सभासदांच्या मागण्यांकरिता शेतकरी संघटना आक्रमक झाली. त्यांनी आज गावात गाव बंद ठेवून आपल्या मागण्यांसाठी आंदोलन केले. या आंदोलनाला आरग येथील व्यापारी संघटनेने उत्स्फूर्त पाठिंबा देत दुपारपर्यंत पूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. सकाळी गावाच्या पूर्वेकडील मारुती मंदिरापासून ते संपूर्ण पेठेतून फेरी काढून ग्रामसचिवालयापर्यंत उत्पादक व आंदोलक मोठ्या संख्येने जमले. त्यानंतर दुचाकीवरून रॅली स्वरूपात कारखाना कार्यस्थळाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडला.
त्यानंतर कारखाना प्रशासनाच्यावतीने दोनवेळा बैठकांसाठी आंदोलकांच्यावतीने शिष्टमंडळाला बोलाविले; परंतु त्या दोन्हीवेळी बैठक फिसकटली. त्यानंतर झालेल्या तिसऱ्या बैठकीत संभाजी मेंढे, संघटनेचे संदीप राजोबा, प्रकाश सटाले, बाबासाहेब पाटील, किसन पाटील आदींच्या शिष्टमंडळातील बारा सदस्यांनी आंदोलकांच्यावतीने चर्चा केली. सुरुवातीला मागण्यांचा तोडगा काढण्यासाठी कारखाना प्रशासनाने एक महिन्याची मुदत मागितली. परंतु आंदोलकांनी ते अमान्य केले व फक्त दहा दिवसांत मार्ग काढा व मागण्या मंजूर करून कार्यवाही करा, असा आग्रह धरला.
सकाळपासून जेवण-पाण्याविना दुपारपर्यंत शेतकरी आक्रमक पवित्रा घेत मोठ्या संख्येने शेवटपर्यंत उपस्थित होते. मोहनराव शिंदे कारखान्याचे अध्यक्ष मनोज शिंदे, संचालक व प्रशासनाने आंदोलकांनी दिलेले निवेदन स्वीकारले. (वार्ताहर)

Web Title: Aggression is off for the second installment of sugarcane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.