Sangli: मेलेल्या सवतीची करणी काढण्यासाठी अघोरी उपाय, कारंदवाडीच्या 'शेंबडेमामा'चा भांडाफोड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2023 04:05 PM2023-12-04T16:05:38+5:302023-12-04T16:05:54+5:30
अंनिस आणि आष्टा पोलिसांचे ‘स्टिंग ऑपरेशन’
आष्टा : मेलेल्या सवतीने केलेली करणी काढण्यासाठी अघोरी उपाय करणाऱ्या कारंदवाडीच्या प्रकाश विष्णू शेंबडे पाटील उर्फ मामा याचा भांडाफोड अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सांगली आणि आष्टा पोलिसांनी ‘स्टिंग ऑपरेशन’ करून केला. त्याच्याविरुद्ध आष्टा पोलिसांनी ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध’ कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
आष्टा पोलिस व अंनिसने दिलेली माहिती अशी, प्रकाश शेंबडे पाटील उर्फ मामा हा त्याचे देव्हाऱ्यात ओटी असून, ती आपोआप आलेली आहे असे म्हणून चमत्काराची अंधश्रद्धाही पसरवत होता. अंनिस कार्यकर्ते राहुल थोरात यांच्याकडे महिन्यापूर्वी निनावी तक्रार आली होती. याची खातरजमा करण्यासाठी कार्यकर्त्या आशा धनाले, त्रिशला शहा आणि डॉ. सविता अक्कोळे यांना डमी भक्त म्हणून पाठवले. धनाले यांनी सांगितले की, ‘माझी मृत सवत स्वप्नामध्ये येते. मला त्रास देते व माझ्या अंगातून प्रचंड वेदना होतात,’ असे खोटे सांगितले. तेव्हा मामाने भंडाऱ्याचे रिंगण काढून धनाले यांच्या कपाळावर भंडारा लावला. तासभर रिंगणामध्ये बसवले. भंडारा घातलेले पाणी पिण्यास देत पाच रविवार दरबारात यावे लागेल, असे सांगितले.
रविवारी सकाळी आष्टा पोलिस ठाण्यात अंनिसचे कार्यकर्ते गेले. शेंबडे पाटील उर्फ मामा मंतरलेला ताईत देऊन अंधश्रद्धा पसरवतो, अशी माहिती दिली. पोलिसांनी अंनिसच्या महिला कार्यकर्त्यांसोबत साध्या वेशात पोलिस दिला. ते कारंदवाडीत मामाच्या दरबारात पोहोचले. आशा धनाले यांनी ‘माझ्या मयत सवतीचा त्रास वाढलेला आहे,’ असे सांगितले. त्यावर उपाय म्हणून भंडाऱ्याच्या रिंगणात बसवले. जीभेवर भंडारा टाकून तुम्हाला बरे वाटेल, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी मंतरलेला ताईत दिला. डॉक्टरांची औषधे घेऊ नका, असे सांगितले. इच्छेप्रमाणे दक्षिणा ठेवण्यास सांगितले. याचवेळी पोलिस दरबारात आले. त्यांनी मामाचा भांडाफोड केला. पंचनामा करून दरबारातील वस्तू जप्त केल्या.
यावेळी आष्टा पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड, सहायक पोलिस निरीक्षक मनमित राऊत, दीपक भोसले, प्रवीण ठेपणे, दीपक पाटील, उज्ज्वला पाटील यांनी ही कारवाई केली. सहायक निरीक्षक मनमित राऊत अधिक तपास करत आहेत.