पाऊण लाख वृक्षांनी बहरलं ‘कृषी पर्यटन’

By admin | Published: May 9, 2017 11:26 PM2017-05-09T23:26:43+5:302017-05-09T23:26:43+5:30

पाऊण लाख वृक्षांनी बहरलं ‘कृषी पर्यटन’

Agrarian Tourism | पाऊण लाख वृक्षांनी बहरलं ‘कृषी पर्यटन’

पाऊण लाख वृक्षांनी बहरलं ‘कृषी पर्यटन’

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : शहरी भागातील पर्यटकांना ग्रामीण बाजाचं जगण देण्याचा प्रयत्न जिल्ह्यातील कृषी पर्यटन केंद्र करत आहेत. जिल्ह्यात सध्या ४८ कृषी पर्यटन केंद्र सुरू झाली आहेत. तर सुमारे २५ पर्यटन केंद्रांचे काम प्रगतीपथावर आहे. पर्यटनाबरोबरचं पर्यावरणाचा वारसा जपण्यासाठी ही कृषी पर्यटन केंद्र आदर्शवत वाटचाल करत आहेत. एकेका पर्यटन केंद्रात सरासरी दीड ते दोन हजार वृक्षांची लागवड होत असल्याने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाळी ही केंद्रे वाळवंटातील मरूद्यान ठरत असल्याचे सकारात्मक चित्र दिसत आहे.
सातारा तालुक्यातील बोरगाव येथील आनंद कृषी पर्यटन केंद्र हे जिल्ह्यातील पहिले केंद्र. कृषी पर्यटन केंद्र म्हणजे नेमके काय हे पाहण्यासाठी सातारा जिल्ह्यासह बाहेरूनही लोकांचा राबता आता केंद्रावर राहिला. स्थानिक लोकांना रोजगार देण्याबरोबरचं निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा अनुभव देण्याचा प्रयत्न जिल्ह्याने अभिमानाने पुढे नेला. गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात ४८ कृषी पर्यटन केंद्रे सुरू झाली आहेत.
जिल्ह्यातील कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून रोजगाराची संधी आणि निसर्गाचा समतोल राखला गेला. त्याबरोबरच वृक्षारोपणाचा नवा पायंडाही पडला. कृषी पर्यटन केंद्रात आलेल्या पर्यटकांना शेतीचा बाज अनुभवायचा असेल तर केंद्राच्या परिसरात हिरवळ अपेक्षित आहे. त्यामुळे पर्यटन केंद्र चालकांनी आंबा, नारळ, चिक्कु, लिंबु, सागवान, कडुनिंब, बाभळ, फणस, केळ, सिताफळ, अ‍ॅपल बोर, गुलाब, झेंडु यांच्यासह विविध मसाल्यांची आणि काही परदेशी वाणाच्या झाडांची लागवड केली.
पर्यटकांना झाडांची माहिती व्हावी हा त्या मागचा उद्देश होता. पण या उद्देशाच्या निमित्ताने एकेका कृषी पर्यटन केंद्रात दीड ते दोन हजार झाडांची लागवड झाली.
जिल्ह्यात झपाट्याने वाढत जाणाऱ्या या कृषी पर्यटन केंद्रांमध्ये आता पर्यटकांचाही चांगला राबता आहे. काही पर्यटन केंद्रांनी येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला रोपटे भेट देण्याचा नवा संकल्प केला आहे. यानिमित्ताने केंद्राची आठवण राहते आणि पर्यावरण रक्षण करण्याच्या कडीत त्यांना गुंफता येते, असे पर्यटन केंद्र चालकांचे मत आहे.
जिल्ह्यातील या पर्यटन केंद्रांमुळे पर्यावरण रक्षणाचा संदेश प्रत्यक्षात उतरला असल्याचे समाधान येथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाकडून व्यक्त होत आहे.
आजपासून पर्यटन विशेषांक
वाचकांच्या गळ्यातील ताईत असलेल्या ‘लोकमत’च्या सातारा आवृत्ती वर्धापन दिनानिमित्त दि. १० मे पासून पर्यटन विशेषांक प्रसिध्द करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पर्यटन स्थळे, निसर्गाची मुक्त उधळण, इतिहासाची साक्ष देणारे किल्ले, पर्यटन क्षेत्रात असलेल्या व्यावसायिक संधी, जागतिक स्तरावर मिळालेले कोंदण आदी सर्वंकष माहितीचा खजीना या विशेषांकाद्वारे वाचकांच्या हाती पडणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव कॅक्टस गार्डन
वनस्पती शास्त्रांत अत्यंत महत्वाचे मानले गेलेले मात्र, माणसांना त्रासदायक असणारे कॅक्टसचे झाड आता फार कमी ठिकाणी पहायला मिळते. बोरगाव येथील आनंद कृषी पर्यटन केंद्रात दुर्मिळ अशा ८२ प्रकारच्या कॅकटसचे स्वतंत्र गार्डन केले आहे. दुर्मिळ वनस्पती एकत्र पहायला मिळाव्यात या उद्देशाने या गार्डनची आखणी केली आहे. पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच हा प्रयोग बोरगाव येथे केला आहे.

Web Title: Agrarian Tourism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.