मुख्यमंत्र्यांना सांगलीत पाय ठेवू देणार नाही सकल मराठा समाजचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 10:40 PM2018-07-27T22:40:00+5:302018-07-27T22:40:32+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठ्यांचा द्वेष करणारे आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर त्यांच्याकडून दिशाभूल करणारी वक्तव्ये होत आहेत.
इस्लामपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठ्यांचा द्वेष करणारे आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर त्यांच्याकडून दिशाभूल करणारी वक्तव्ये होत आहेत. सरकारमधील काही मंत्री मराठा समाजाच्या भावना दुखावणारी वक्तव्ये करीत आहेत. त्यामुळे मराठा समाजात संताप निर्माण झाला आहे. अशा स्थितीत मुख्यमंत्र्यांना सांगलीत पाय ठेवू देणार नाही, असा इशारा वाळवा तालुका सकल समाजाच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत दिला. आज, शनिवारी शहरात धरणे आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
मराठा क्रांती मोर्चाच्या तालुका समन्वय समितीच्या कॉ. दिग्विजय पाटील, बी. जी. पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांना ३० जुलैरोजी सांगलीमध्ये येऊ देणार नाही आणि जर ते आलेच, तर त्यांचे कार्यक्रम उधळून लावणार. मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीची पूजा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना रोखण्यात आले. मात्र त्यांनी राज्याच्या गुप्तवार्ता विभागाचा अहवाल फोडून पंढरपूरच्या वारीत साप सोडले जाणार होते, अशी माहिती दिली. कायद्याने अशी कोणतीही गुप्त माहिती सादर करता येत नाही.
पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाचे आंदोलन ऐतिहासिक आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आजवर हिंसेला कधीही महत्त्व दिलेले नाही. आमचा अहिंसेवर विश्वास आहे. मात्र तरीही मोर्चामध्ये समाजकंटक घुसलेले आहेत, असे बेताल वक्तव्य महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून होत आहे. भाजप, शिवसेना सरकारने आरक्षणाबाबत मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसली आहेत.
ते म्हणाले, तोडफोड, जाळपोळीवरुन मराठा समाजाला आरक्षणाच्या मुद्याबाबत बदनाम करण्याचा डाव सत्ताधारी करत आहेत. ही बदनामी त्वरित थांबवावी. सांगली येथील महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांना यायचे असेल, तर त्यांनी येतानाच मराठा आरक्षणाचा अध्यादेश सोबत आणावा.
मराठा समाजाला सरकारी, खासगी नोकरीत आरक्षण द्या, उद्योग—व्यवसायासाठी भांडवल पुरवठा करा, कौशल्य विकास, शेतीपूरक तंत्रज्ञानासाठी कर्ज आणि अनुदान द्या. त्यासाठी तालुकास्तरावर स्वतंत्र कार्यालय सुरु करुन महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र वसतिगृहे सुरु करावीत, असेही ते म्हणाले.यावेळी उमेश कुरळपकर, विजय महाडिक, सुयोग औंधकर, सागर जाधव उपस्थित होते.
आज धरणे आंदोलन
मराठा आरक्षणाच्या अध्यादेशासाठी आज, शनिवारी दिवसभर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी पंचायत समिती आवारातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन मराठा समाजाचे तरुण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात दिवसभर ठिय्या मारणार आहेत.