तासगावात नेत्यांचा तह; कार्यकर्त्यांचे युध्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:40 AM2020-12-16T04:40:50+5:302020-12-16T04:40:50+5:30
लाेकमत न्युज नेटवर्क तासगाव : तासगाव तालुक्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या रणधुमाळीत पारंपरिक आमदार आणि खासदार गटांतच ...
लाेकमत न्युज नेटवर्क
तासगाव : तासगाव तालुक्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या रणधुमाळीत पारंपरिक आमदार आणि खासदार गटांतच लढती होणार असल्याचे स्पष्ट आहे. मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपासून दोन्ही नेत्यांच्या भूमिकेमुळे ग्रामपंचायत निवडणुकीत नेते कोणती भूमिका घेणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे. नेत्यांचा तह आणि कार्यकर्त्यांत युध्द होणार असल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.
तासगाव तालुक्यातील बहुतांश निवडणुका आबा गट आणि काका गट अशा पारंपरिक गटातच झालेल्या आहेत. या दोन्ही गटांतील निवडणुका संवेदनशील होत असतात, हा तालुक्याचा इतिहास अगदी बाजार समिती आणि तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीपर्यंत कायम होता; मात्र त्यानतंर तालुक्यात अंडरस्टॅन्डिंगचे राजकारण सुरू झाले.
दोन्ही नेत्यांतील अंडरस्टॅन्डिंगमुळे यावेळच्या ग्रामपंचायत निवडणुकीत नेत्यांकडून कितपत रसद मिळणार, याबाबत अद्याप संभ्रम आहे. गावांतील पारंपरिक गटांत लढत होत असताना, नेत्यांकडून रसद मिळणे प्रत्येक कार्यकर्त्याला अपेक्षित आहे.
विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत सगळेच गट एकत्रित मतदान करत असल्याने नेत्यांकडूनही अद्याप पत्ते उघड झालेले नाहीत. मात्र कार्यकर्त्यांत झुंज कायम ठेवण्यासाठी दोन्ही नेत्यांकडून पाठबळ दिले जाईल आणि पुन्हा सगळे आपलेच, ही भूमिका घेतली जाईल, अशी चर्चा असून, नेत्यांच्या तहात कार्यकर्त्यांनी मात्र गावपातळीवरील लढती प्रतिष्ठेच्या केल्याचे दिसून येत आहे.
चौकट
अलिखित तहाची चर्चा
तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलत गेली. या बदलत्या समीकरणांवर वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिक्कामोर्तब झाले. तेेव्हापासून विधानसभेला सुमनताई आणि लोकसभेला संजयकाका अशी चर्चा सुरू झाली आणि या देान नेत्यांत अलिखित तह झाल्याची चर्चा कार्यकर्त्यांत सुरू झाली.
000
फोटाे : खासदार संजयकाका पाटील, आमदार सुमनताई पाटील