सांगलीतील साखराळेचा सुपुत्र बनला नीती आयोगाचा कृषी सल्लागार, पंतप्रधान मोदींसमवेत काम करण्याचा मिळाला बहुमान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 11:46 AM2024-02-07T11:46:13+5:302024-02-07T11:46:44+5:30
नीती आयोग ही भारत सरकारची विकास धोरण ठरवणारी सर्वोच्च संस्था
युनूस शेख
इस्लामपूर : साखराळे (ता. वाळवा) येथील कृषी धोरण शास्त्रज्ञ व साहित्यिक डॉ. शशांक कुलकर्णी यांची भारत सरकारच्या कृषी व संलग्न विषयाचे सल्लागार म्हणून निवड झाली आहे. नीती आयोग ही भारत सरकारची विकास धोरण ठरवणारी सर्वोच्च संस्था आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत.
डॉ. कुलकर्णी हे कृषी धोरण अभ्यासक आहेत. सध्या ते इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे शैक्षणिक सल्लागार म्हणून काम पाहतात. नवी दिल्ली येथील भारतीय ॲग्रो इकॉनॉमिक रिसर्च सेंटरच्या नियामक मंडळाचे सदस्य आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाचे वरिष्ठ संशोधक सदस्य म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे.
भारताच्या शेतकरी धोरणाच्या संदर्भात त्यांनी केलेल्या मूलभूत संशोधन कार्याची दखल घेऊन दक्षिण अमेरिकेतील रिपब्लिक ऑफ पनामा या देशातील प्रख्यात स्वाहिली विद्यापीठाने त्यांचा डी.लिट. पदवी देऊन गौरव केला आहे. त्यांनी लिहिलेल्या स्वामीनाथन कमिशन : ए फाउंडेशन ऑफ फार्म्स पॉलिसिज इन इंडिया या त्यांच्या पुस्तकाला भारतीय हरित क्रांतीचे जनक प्रो. एम.एस. स्वामीनाथन यांची प्रस्तावना लाभली आहे.
स्वामीनाथन आयोगावर लिहिलेले जगातील पहिले व एकमेव पुस्तक म्हणून नॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. महाराष्ट्र शासनाने डॉ. कुलकर्णी यांच्या समन्वयातून समग्रतेकडे या पुस्तिकेची निवड शासकीय निवडक ग्रंथ सूचित केली आहे. त्यांच्या संशोधन आणि लेखन कार्यासाठी १९ आंतरराष्ट्रीय व १२ राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
सर्वोच्च धोरण संस्थेचा भाग बनल्याने कौतूक
काही काळ त्यांनी जम्मू-काश्मीर विद्यापीठात वरिष्ठ संशोधक म्हणूनही काम केले आहे. शेती व शेतकरी धोरणांच्या संशोधन क्षेत्रात कुलकर्णी यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण संशोधन कार्यामुळे फॉक्सक्लूज या संस्थेने बनवलेल्या भारतातील सर्वोच्च १०० प्राध्यापक, संशोधक व शिक्षकांच्या यादीत त्यांना स्थान मिळाले आहे. देशातील सर्वोच्च धोरण संस्थेत झालेल्या या नियुक्तीमुळे डॉ. शशांक कुलकर्णी यांचे अभिनंदन होत आहे.