कृषि दिन व कृषि संजीवनी मोहिमेचा उत्साहात समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 07:42 PM2021-07-01T19:42:57+5:302021-07-01T19:44:50+5:30
Agriculture Sector Sangli : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंत आज जिल्ह्यामध्ये कृषि दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच जिल्ह्यामध्ये खरीम हंगाम 2021 यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषि तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी जिल्ह्यात दि. 21 जून ते 1 जुलै दरम्यान राबविण्यात आलेल्या कृषि संजीवनी मोहिमेचा समारोप करण्यात आला.
सांगली: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंत आज जिल्ह्यामध्ये कृषि दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच जिल्ह्यामध्ये खरीम हंगाम 2021 यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषि तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी जिल्ह्यात दि. 21 जून ते 1 जुलै दरम्यान राबविण्यात आलेल्या कृषि संजीवनी मोहिमेचा समारोप करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी उपस्थित शेतकरी तसेच रब्बी हंगाम पिक स्पर्धा सन 2020-21 मधील विजेत्या शेतकऱ्यांचे अभिनंदन केले व खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
आत्मा सभागृह, विजयनगर, सांगली येथे झालेल्या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी, कृषि उपसंचालक प्रभाकर पाटील, तंत्र अधिकारी मयुरा काळे, जिल्हा परिषद कृषि विकास अधिकारी विवेक कुंभार, जिल्हा मृद सर्व्हेक्षण व मृद चाचणी अधिकारी अमित कवठेकर, कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील विजेते शेतकरी उपस्थित होते.
यावेळी कृषि दिनाचे औचित्य साधून रब्बी हंगाम पिक स्पर्धा सन 2020-21 मधील हरभरा, गहू, रब्बी ज्वारी पिकासाठी विभागस्तर व जिल्हास्तरावर विजेत्या झालेल्या शेतकऱ्यांना प्रशस्तीपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते जिल्हास्तरावरून सन्मानित करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील विविध पिकात अधिक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या लागवड पध्दतीच्या माहिती पुस्तिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, उपस्थित अधिकारी व पिक स्पर्धेतील विजेते शेतकरी यांच्याहस्ते कृषि चिकित्सालय फळरोपवाटीका कुपवाड कार्यालयाच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी कृषि संजीवनी मोहिमेचा समारोप केला. प्रारंभी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.