कृषी महोत्सवास भाजपची किनार -इस्लामपुरात आयोजन : दख्खन जत्रेवर ‘रयत’चे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 11:48 PM2019-01-08T23:48:12+5:302019-01-08T23:48:41+5:30
महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. ९ जानेवारीपासून सांगली जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर भाजपचे सावट असले तरी, या दख्खन
-अशोक पाटील ।
इस्लामपूर : महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. ९ जानेवारीपासून सांगली जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर भाजपचे सावट असले तरी, या दख्खन यात्रेत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेचाच बोलबाला सुरु आहे.
आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात आमदार जयंत पाटील यांनी विविध आणि महत्त्वाची खाती सांभाळत उल्लेखनीय प्रगती केली. त्यामुळे इस्लामपूर मतदारसंघात राष्ट्रवादीचा ठसा उमटला आहे. याच तालुक्यातील, परंतु शिराळा मतदारसंघातील कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी अल्पावधित मुसंडी मारण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. परंतु त्यांना पाहिजे तेवढे यश मिळाले नसल्याचे चित्र आहे. यासाठी मंत्री खोत यांनी जिल्हास्तरावरील इव्हेंट इस्लामपुरात घेऊन आमदार जयंत पाटील, खासदार राजू शेट्टी यांना आव्हान दिले आहे. त्यांच्या खांद्यावर भाजपचा झेंडा असला तरी, दख्खन यात्रेत मात्र रयत क्रांती संघटनेचे वर्चस्व पाहायला मिळत आहे.
आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच काही दिवसांपूर्वी राज्यपातळीवरील जंगी कबड्डी स्पर्धा आणि आता जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. गतवर्षीच्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाला स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. यावेळी मात्र मुख्यमंत्री वगळता भाजपच्या इतर मंत्र्यांची फौज पाचारण करण्यात आली आहे. एकूणच भाजपची ही खेळी आमदार जयंत पाटील यांच्यासाठीच सुरु असल्याचे प्रकर्षाने जाणवते.
निमंत्रण पत्रिकेत नावे..!
हा कृषी महोत्सव शासकीय असल्याने निमंत्रण पत्रिकेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी, काँग्रेसचे शिवाजीराव देशमुख, नानासाहेब महाडिक, नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांच्या नावांचा उल्लेख आहे. परंतु यातील कोण कार्यक्रमाला उपस्थित राहणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.