निधीअभावी रखडले सांगलीचे अहिल्यादेवी स्मारक

By Admin | Published: July 28, 2016 11:55 PM2016-07-28T23:55:46+5:302016-07-29T00:28:29+5:30

आश्वासन हवेत : अजून ४४ लाखाची गरज; महापालिकेच्या निधीवर अवलंबून

Ahilyadevi memorial at Sangli | निधीअभावी रखडले सांगलीचे अहिल्यादेवी स्मारक

निधीअभावी रखडले सांगलीचे अहिल्यादेवी स्मारक

googlenewsNext

सांगली : शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे काम गेली पाच वर्षे रखडले आहे. तत्कालीन राष्ट्रवादी व शिवसेना, भाजपच्या आमदारांनी या स्मारकाच्या भूमीपूजनप्रसंगी जाहीर केलेला निधी अद्यापही मिळालेला नाही. तत्कालीन आमदारांनीच निधीचा ठेंगा दाखविल्याने स्मारक पूर्ण करण्याची जबाबदारी महापालिकेवर आली आहे. त्यात आर्थिक स्थितीमुळे पालिकेकडून गेल्या दोन वर्षात स्मारकासाठी अपेक्षित निधी मिळालेला नाही.
राज्यच नव्हे, तर देशात महापालिकेच्यावतीने अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारलेले नाही. पण त्याला सांगली महापालिका अपवाद ठरली होती. महापालिकेने वानलेसवाडी येथील ३२ गुंठे जागेवर स्मारक उभारण्याचा ठराव केला. तत्कालीन महापौर नितीन सावगावे यांच्या काळात स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला तत्कालीन मंत्री जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादी व भाजपचे आमदार उपस्थित होते. या कार्यक्रमात शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी दूरध्वनीवर दहा लाखाचा निधी देण्याचे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे संभाजी पवार यांनी २० लाख, प्रकाश शेंडगे यांनी २०, तर रमेश शेंडगे यांनी २० लाख रुपयांच्या निधीची घोषणा केली. सांगली-सातारा स्थानिक स्वराज संस्थेचे आमदार प्रभाकर घार्गे यांनीही निधीची घोषणा केली. केवळ घार्गे यांनीच साडेसात लाख रुपयांचा निधी स्मारकासाठी दिला. उर्वरित आमदारांकडे स्मारक समितीने वारंवार पाठपुरावा करूनही निधी मिळाला नाही.
परिणामी स्मारक पूर्ण करण्याची जबाबदारी महापालिकेवर येऊन पडली. पालिकेने पहिल्या फेजसाठी ३५ लाखाची निविदा काढली. त्यातून गेस्टरूम, कार्यालय, ग्रंथालयाची इमारत व इतर बांधकाम झाले. दुसऱ्या फेजसाठी ४४ लाखाची निविदा काढून त्यातून कंपाऊंड भिंत, कमान, चित्रशिल्प आदि कामे पूर्ण करण्यात आली आहेत. आता तिसऱ्या फेजचे काम रखडले आहे. यामध्ये अहिल्यादेवींचा पुतळा, पेव्हिंग, बाकडी, पाण्याची टाकी, लॉन अशा सुमारे ४४ लाख रुपयांच्या कामाचा समावेश आहे. गेल्या दोन वर्षात या कामासाठी महापालिकेकडून फारसा निधी मिळू शकला नाही. नुकतीच साडेसात लाखाची निविदा काढली आहे. उर्वरित कामाच्या मंजुरीसाठी फाईल मुख्य लेखापरीक्षकांच्या टेबलावर आहे. या कामाला आयुक्तांच्या मान्यतेनंतर गती येणार आहे. त्यामुळे पालिकेतील समाजाचे नगरसेवक, स्मारक समिती आयुक्तांकडे पाठपुरावा करीत आहे. आमदारांनी आश्वासन पाळले असते तर पालिकेवरील आर्थिक बोजा कमी होऊन स्मारक केव्हाच पूर्ण झाले असते. (प्रतिनिधी)

एक कोटीची तरतूद
महापालिकेच्या यंदाच्या अंदाजपत्रकात स्मारकासाठी एक कोटी १० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महापौर हारूण शिकलगार यांची भेट घेऊन, नगरसेवकांनी स्मारकाला निधी देण्याची मागणी केली होती. त्यानुसार शिकलगार यांनी निधीची तरतूद केली असली तरी, जनरल फंडातील कामाबाबत नेहमीच दिरंगाई होत असते, ठेकेदारांची बिले निघत नसल्याने जनरल फंडातील कामे घेण्यात ते तयार नसतात, त्याचा प्रत्यय स्मारकाच्या कामातही येत आहे, त्यासाठी खास बाब म्हणून आयुक्तांनी लक्ष घालून स्मारकाचे काम पूर्ण करावे, अशी मागणीही नागरिकांतून होऊ लागली आहे.

महापालिकेकडून अहिल्यादेवींचे स्मारक उभारण्याचा हा देशातील पहिलाच प्रकल्प आहे. महाआघाडीच्या काळात स्मारकाचे काम गतीने सुरू होते. पण आता निधीअभावी कामे रखडली आहेत. आयुक्त रवींद्र खेबूडकर यांची भेट घेऊन, स्मारकाला भेट देण्याची विनंती केली आहे. त्यांनीही ती मान्य केली आहे. येत्या ३१ मे २०१७ पूर्वी स्मारकाचे काम पूर्ण होऊन अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी त्याचे लोकार्पण व्हावे, यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे.
- विष्णू माने, नगरसेवक तथा स्मारक समिती सदस्य

Web Title: Ahilyadevi memorial at Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.