पूरग्रस्तांसाठी मदत स्वीकृती केंद्र सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:25 AM2021-07-26T04:25:23+5:302021-07-26T04:25:23+5:30
सांगली : जिल्ह्यात निर्माण झालेल्या महापूरस्थितीमुळे अनेकांचे स्थलांतर झाले आहे. या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्वस्तरातून मदतीचा ओघ सुरु आहे. यासाठी ...
सांगली : जिल्ह्यात निर्माण झालेल्या महापूरस्थितीमुळे अनेकांचे स्थलांतर झाले आहे. या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्वस्तरातून मदतीचा ओघ सुरु आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात व तालुकास्तरावर मदत स्वीकृती केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. ज्या संस्था पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत करू इच्छितात त्यांनी ‘कलेक्टर सांगली फ्लड रिलीफ फंड’मध्ये आर्थिक मदत जमा करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. चाैधरी यांनी सांगितले की, पूरग्रस्तांना मदत करताना खाद्यपदार्थ देण्याऐवजी धान्य पुरवठा आणि स्वयंपाकासाठी आवश्यक साहित्य कोरड्या स्वरुपात द्यावे. गावागावांमध्ये परस्पर मदत न करता शासनाच्या मदत स्वीकृती केंद्रावर मदत पोहोचविल्यास मदतीचा योग्य वापर करता येईल. सर्व मदत पोहोचविणाऱ्या सर्व व्यक्ती व संस्थांची यादी प्रशासनाच्या संकेतस्थळावर दैनंदिन स्वरुपात दर्शविण्यात येणार आहे.
गहू, तांदूळ, डाळी, कोरडा शिधा, तेलाची पॅकबंद पिशवी, साखर, चहापावडर, मीठ, साबण, ब्लँकेट्स, भांडी अशा स्वरुपात साहित्य देण्यात यावे. मेडिकल किटमध्ये मास्क, सॅनिटायझर, हॅण्डवॉश इत्यादी साहित्याचा समावेश करण्यात यावा. जुने कपडे तसेच खराब होऊ शकणारे खाद्यपदार्थ कोणीही देऊ नयेत. ते स्वीकारले जाणार नाहीत. २०१९मध्ये संस्थांनी मोठी मदत केली होती. यावेळीही सर्वांनी पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.