अवीट ‘गीतरामायण’ने रसिकांना जिंकले
By Admin | Published: April 19, 2016 11:45 PM2016-04-19T23:45:46+5:302016-04-20T00:42:03+5:30
‘लोकमत’चा उपक्रम : नाट्यगृह हाऊसफुल्ल; सुधीर गाडगीळ यांचा सत्कार
सांगली : श्रीरामाच्या सुंदर कथाविश्वात घेऊन जाणाऱ्या ‘गीतरामायण’ या संगीत कार्यक्रमाने सांगलीकर रसिकमनांना जिंकले. एकापेक्षा एक अवीट गोडीच्या गीतांना आणि त्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणास टाळ्यांच्या कडकडाटात रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला . ‘लोकमत’ सखी मंच व रामायण अभ्यास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीरामनवमीनिमित्त भावे नाट्यमंदिरात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ यांच्याहस्ते ‘लोकमत’चे संस्थापक जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. यावेळी ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, शाखा व्यवस्थापक विक्रम हसबनीस, आवृत्तीप्रमुख श्रीनिवास नागे, गायक श्रीरंग जोशी उपस्थित होते. यावेळी गाडगीळ यांच्याहस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला. संयोजिका आभा पाटणकर यांनी स्वागत केले.
राजा दशरथाच्या कथेपासून रामजन्म, रामाचा वनवास, युध्द, वानर सेनेचा पराक्रम, असा हा श्रीरामायणातील अजरामर घटनांचा संगीतमय प्रवास निवेदक दीपक पाटणकर यांनी रसिकांसमोर मांडला. त्या काळातील श्रीरामायणातील कथेचा आजच्या वास्तवाशी कसा संबंध आहे, याचे उदाहरणही दिले.
या कार्यक्रमाची सुरुवात श्रीरंग जोशी यांच्या ‘स्वये श्री रामप्रभू ऐकती...’ या गाण्याने झाली. ‘शरयू तीरावरी, ज्येष्ठ तुझा, माता न तू वैरिणी, देव हो, या बाळानो...’ या श्रीरंग जोशी याने गायिलेल्या गाण्यांना रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अभिषेक तेलंग याने ‘दशरथा घे हे..., नकोस नौके..., दैवजात... सेतू बांधा रे, प्रभो मज एकची वर द्यावा...’ ही सुंदर भावपूर्ण गाणी सादर केली. कीर्ती पेठे यांनी ‘राम जन्मला ग सखी राम जन्मला...’ हे रामजन्माचे गाणे सादर केले. यशश्री जोशी हिने ‘आनंद सांगू किती, या इथे लक्ष्मणा, तोडीता फुले...’ ही गाणी सादर केली. साक्षी हेब्बाळकर हिने ‘स्वयंवर झाले सीतेचे...’ आणि ‘विरुप झाली शुर्पणखा...’ ही गाणी सादर केली. आस्था ओगले हिने ‘निरोप कसला, धन्य ती शबरी श्रीरामा’ ही गाणी सादर केली. छोटा गायक श्रीनिवास हसबनीस यांनी ‘गीतरामायणा’तील ‘नकासे नौके’ हे गाणे सादर केले.
संगीत संयोजन परेश पेठे यांनी श्रीरामाची सुंदर कथा, गाण्यांची लयबध्दता तबल्यांच्या सुंदर सुरावटीतून रसिकांपर्यंत पोहोचवली. त्यांना भास्कर पेठे (संवादिनी), परेश पेठे (तबला), मनाली रानडे (बासरी), प्रशांत भाटे (सिंंथेसायझर), प्रशांत कुलकर्णी (तालवाद्य) यांनी संगीतसाथ केली. (प्रतिनिधी)
‘गा बाळांनो श्रीरामायण...’
कवी ग. दि. माडगूळकर यांच्या सिध्दहस्त लेखणीतून साकारलेल्या ‘गीतरामायणा’तील अवीट गोडीची, मोहवून टाकणारी अजरामर गाणी... निवेदक दीपक पाटणकर यांचे अभ्यासपूर्ण निवेदन... परेश पेठे यांचे अप्रतिम संगीत संयोजन... जोडीला नवोदित गायक कलाकारांची गाणी... सारा सोहळा जणू श्रीरामाच्या स्वागतासाठी होता. कार्यक्रम संपल्यानंतर ‘अवघ्या आशा श्रीरामार्पण... गा बाळांनो श्रीरामायण...’ असे वातावरण नाट्यगृहात होते. कवी गदिमा... गायक, संगीतकार, ज्येष्ठ गायक सुधीर फडके यांच्या लोकप्रियतेमुळे घरा-घरात, मना-मनात वसलेले ‘गीतरामायण’ ६० वर्षांनंतरही तसेच टवटवीत असल्याचा अनुभव कार्यक्रमातून आला.