ऐतवडे बुद्रुकला सात-बारावरील नोंदीच गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:32 AM2021-08-17T04:32:59+5:302021-08-17T04:32:59+5:30
वर्षानुवर्षे खातेदारांच्या असणाऱ्या विविध नोंदी हस्तलिखित सात-बाऱ्यावर कायम होत्या; परंतु ऐतवडे बुद्रुकमध्ये हस्तलिखिताचे ऑनलाईन करताना बहुतांशी विहीर पड, जनावरांचा ...
वर्षानुवर्षे खातेदारांच्या असणाऱ्या विविध नोंदी हस्तलिखित सात-बाऱ्यावर कायम होत्या; परंतु ऐतवडे बुद्रुकमध्ये हस्तलिखिताचे ऑनलाईन करताना बहुतांशी विहीर पड, जनावरांचा गोठा, एकोमा, पिकाऊ जमिनीचे क्षेत्र गायब झाले आहेत. काहींच्या ऑनलाईनला नोंद झाल्या होत्या. मात्र, गेल्या दोन वर्षांत ऑनलाईन असणाऱ्या नोंदीही यंदाच्या वर्षी अचानक गायब झाल्या आहेत.
यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी सरपंचाकडे याबाबत तक्रार केली. आपण प्रांताधिकाऱ्यांना ग्रामपंचायतीतर्फे लेखी निवेदन देऊ, असे आश्वासन सरपंच प्रतिभा बुद्रुक, उपसरपंच अशोक दिंडे यांनी दिले. यावेळी माजी उपसरपंच सौरभ पाटील, ग्राम विकास अधिकारी दत्तात्रेय कोळी, गजानन गायकवाड, दादासो कांबळे, धनंजय गायकवाड, प्रा. वर्धमान बुद्रुक उपस्थित होते.
चौकट
कॅम्प घेऊन नोंदणी करा
आत्ता महापूर, अतिवृष्टीमुळे अनेकांच्या विहिरींची पडझड झाली आहे. अजून पंचनामेही बाकी आहेत. पंचनाम्यासाठी शेतकरी दिवसेंदिवस वाट पाहत आहेत. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रत्यक्षात विहिरी आहेत, पण सात-बाऱ्यावरून गायब केल्या आहेत. तलाठ्यांनी कॅम्प घेऊन या नोंदी मोफत करून द्याव्यात अन्यथा आंदोलन करू, असा इशारा माजी उपसरपंच सौरभ पाटील यांनी दिला आहे.