तासगाव-कवठेमहांकाळमध्ये खुर्चीसाठी पक्ष बदलाचा नेत्यांचा पायंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 05:13 PM2024-10-25T17:13:04+5:302024-10-25T17:14:20+5:30

आबा गटाची भूमिका जैसे थे; घोरपडे, संजयकाकांनी कितीवेळा बदलली भूमिका

Ajitrao Ghorpade changed role eight times and former MP Sanjay Patil four times for power in Tasgaon-Kawathe Mahankal | तासगाव-कवठेमहांकाळमध्ये खुर्चीसाठी पक्ष बदलाचा नेत्यांचा पायंडा

तासगाव-कवठेमहांकाळमध्ये खुर्चीसाठी पक्ष बदलाचा नेत्यांचा पायंडा

दत्ता पाटील

तासगाव : ' खुर्चीसाठी काय पण ', हे राजकारण गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू आहे. त्याला तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघ देखील अपवाद नाही. या मतदारसंघातील सर्वच नेत्यांनी वेळोवेळी राजकीय भूमिका बदलली आहे. माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी तब्बल आठ वेळा, माजी खासदार संजय पाटील यांनी चार वेळा, तर माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी एक वेळा राजकीय भूमिका बदलली आहे. त्यामुळे इथे खासदार व आमदारकीच्या खुर्चीसाठी पक्ष बदलाचा पायंडाच पडला आहे.

तासगाव -कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात आर.आर. पाटील गट, संजय पाटील गट आणि घोरपडे गट तुल्यबळ आहेत. या तिन्ही गटाच्या नेत्यांची भूमिका प्रत्येक निवडणुकीसाठी निर्णायक ठरते. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीचा केंद्रबिंदू या तिन्ही गटांच्या नेत्यांभोवतीच फिरत राहिला आहे.

सध्या होत असलेले विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे माजी खासदार संजय पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून घड्याळ हातात घेतले आहे. लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणाऱ्या माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनीही राष्ट्रवादीला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. अवघ्या दोन महिन्यातच दोन्ही नेत्यांनी अनपेक्षित पणे बदललेल्या राजकीय भूमिकेमुळे या मतदारसंघातील नेत्यांच्या राजकीय वाटचालीची चर्चा सुरू झाली आहे.

अशा बदलल्या भूमिका..

  • अजितराव घोरपडे यांनी राजकारणाची सुरुवात जनता दलाच्या माध्यमातून केली. मात्र, आतापर्यंत त्यांनी आठ वेळा राजकीय भूमिका बदलली असून सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उंबरठ्यावर येऊन थांबले आहेत.
  • माजी खासदार संजय पाटील यांनी काँग्रेसमधून राजकीय प्रवास सुरू केला. त्यांनीही चारवेळा राजकीय भूमिका बदलली असून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी एक वर्तुळ पूर्ण केले आहे.
  • माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी देखील काँग्रेसमधून राजकारणाची सुरुवात केली. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर राष्ट्रवादीत प्रवेश करून एक वेळ राजकीय भूमिका बदलली. त्यांच्या पश्चात त्यांच्या वारसांनी मात्र राष्ट्रवादीच्या फुटी वेळी राजकीय भूमिका बदलली नाही.


आबा गटाची भूमिका जैसे थे

आर.आर. पाटील यांच्या पश्चात आमदार सुमनताई पाटील विधानसभेत नेतृत्व करत होत्या. तर यावेळी रोहित पाटील विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यांनी राजकीय भूमिका बदलण्याऐवजी शरद पवार यांचे नेतृत्व स्वीकारले.

मतदारसंघातील नेत्यांचा राजकीय प्रवास 

आर.आर. पाटील - १९९० काँग्रेस, १९९९ पासून राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट)

संजय पाटील - १९९९ काँग्रेस, २००४ अपक्ष, २००८ राष्ट्रवादी विधानपरिषद सदस्य, २००९ राष्ट्रवादी उमेदवार आर.आर. पाटील यांच्यासोबत. २०१४ - भाजप प्रवेश करून लोकसभेत, २०१९ - भाजपकडून लोकसभा लढवली, २०२४- विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

अजितराव घोरपडे :
१९८५ - जनता पक्षाकडून विधानसभा लढवली.
१९९० - शेतकरी विकास आघाडीच्या माध्यमातून अपक्ष विधानसभा लढवली.
१९९५ - शेतकरी विकास आघाडीच्या माध्यमातून अपक्ष आमदार म्हणून विजयी. युती सरकारला पाठिंबा.
१९९९ - शेतकरी विकास आघाडीतून अपक्ष म्हणून दुसऱ्यांदा आमदार; काँग्रेसला पाठिंबा.
२००४ - काँग्रेसमध्ये प्रवेश करून काँग्रेसकडून आमदार
२००९ - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश; आर.आर. पाटील यांना पाठिंबा.
२०१४ - भाजपकडून विधानसभा लढवली.
२०१९ - शिवसेनेकडून विधानसभा लढवली.
२०२४ - राष्ट्रवादीच्या वाटवेर; विधानसभेला राष्ट्रवादीला पाठिंबा.

Web Title: Ajitrao Ghorpade changed role eight times and former MP Sanjay Patil four times for power in Tasgaon-Kawathe Mahankal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.