अजमेर-म्हैसूर एक्स्प्रेस पाण्यासाठी रोखली
By admin | Published: April 11, 2016 11:07 PM2016-04-11T23:07:47+5:302016-04-12T00:35:29+5:30
मिरजेत प्रवाशांचा संताप : अधीक्षकांना घेराव
मिरज : अजमेर-म्हैसूर एक्स्प्रेस गाडीत पाणी नसल्याच्या कारणावरून सोमवारी संतप्त रेल्वे प्रवाशांनी मिरजेत एक तास एक्स्प्रेस रोखली. स्थानक अधीक्षकांना घेराव घालून जाब विचारला. त्यामुळे रेल्वे स्थानकात गोंधळ उडाला.
अजमेर-म्हैसूर ही एक्स्प्रेस गाडी आज सकाळी पुण्यात पोहोचल्यानंतर प्रवाशांना वाटले की, रेल्वे गाडीमध्ये पुणे स्थानकात पाणी भरले जाईल. मात्र पाणी न भरताच एक्स्प्रेस मिरजेकडे येण्यास निघाली. गाडीत पाणी नसल्याने शौचास जाण्याचीही अडचण झाली. पाण्याअभावी रेल्वे गाडीत दुर्गंधी पसरल्याने त्याचा प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. अजमेर-म्हैसूर एक्स्प्रेस मिरजेत सकाळी १० वाजून २० मिनिटांनी आली असता, मिरजेत पाणी भरण्याची व्यवस्था आहे. मात्र मिरजेतून लातूरला पाणी पाठविण्यासाठी रविवारी दुपारपासून सोमवारी पहाटेपर्यंत रेल्वे टँकरमध्ये पाणी भरण्याचे काम सुरू होते. यामुळे रेल्वे स्थानकावरील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. स्थानकामध्येही पिण्याचे पाणी उपलब्ध नव्हते. यामुळे अजमेर एक्स्प्रेसमधील सर्व प्रवासी संतप्त झाले. त्यांनी स्टेशन अधीक्षकांना घेराव घालून रेल्वेत पाणी भरण्यासाठी एक्स्प्रेस गाडी मिरज स्थानकात एक तास रोखून धरली. तात्काळ रेल्वे अधिकाऱ्यांनी जलशुध्दीकरण केंद्रास संपर्क साधून रेल्वे गाडीत पाणी भरण्याची व्यवस्था केल्याने अजमेर-म्हैसूर एक्स्प्रेस म्हैसूरकडे मार्गस्थ झाली. त्यामुळे पुढे जाणाऱ्या अनेक प्रवाशांचे हाल झाले. (वार्ताहर)