आक्कुबार्इंनी जपली ओव्यांची संस्कृती आधुनिकीकरणाच्या जमान्याला छेद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 11:17 PM2018-03-30T23:17:26+5:302018-03-30T23:17:26+5:30
वारणावती : आधुनिकीकरणाच्या जमान्यात दळण-कांडणाच्या गिरण्या गावात आल्या आणि जात्याची घरघर बंद झाली. मिक्सरचा खरखराट स्वयंपाकघरात ऐकू येऊ लागला.
गंगाराम पाटील ।
वारणावती : आधुनिकीकरणाच्या जमान्यात दळण-कांडणाच्या गिरण्या गावात आल्या आणि जात्याची घरघर बंद झाली. मिक्सरचा खरखराट स्वयंपाकघरात ऐकू येऊ लागला. या यांत्रिकीकरणामुळे जाते अडगळीत पडले. त्यासोबतच जात्यावरच्या ओव्याही नामशेष होऊ लागल्या.
मात्र याला सोंडोली (ता. शाहुवाडी) येथील आक्कुबाई शामराव पाटील या अपवाद ठरल्या आहेत. आक्कुबार्इंनी बहिणाबार्इं चौधरींच्या संस्काराचा वारसा पुढे चालू ठेवला आहे. आजही त्या ओव्यांतून संस्कृतीचे जतन करताना दिसतात.
नात्यातील हळुवारपणा, सामाजिक संवेदनशीलता, कृषी जीवनाबद्दलचा आपलेपणा, प्राणी-पक्षी यांच्याविषयीचा कळवळा आणि देव-देवतांबद्दलची श्रध्दा आक्कुबाई मावशींच्या ओव्यांतून जाणवते.
आक्कुबाई यांनी चकचकीत फरशीच्या घरात आजही जात्याला आपल्यापासून लांब केलेले नाही. आपली सख्खी जाऊ किसाबाई पाटील जी चुलत बहीणही आहे, तिच्यासोबत नात्याचा ओलावा जपत, त्या जात्यावरील ओव्या गात गुण्यागोविंदाने नांदत आहेत.सध्याच्या आधुनिक काळात नातेसंबंधात दुरावा निर्माण झाला आहे. मात्र आक्कुबाई यांनी मनाची, भावनिकतेची श्रीमंती जपली आहे.त्यांचे चिरंजीव प्राध्यापक डॉ. सदा पाटील लोकसाहित्याचे अभ्यासक आहेत. त्यांनीही लोकसंस्कृतीची जपणूक करणाऱ्या आईचा आदर्श घेऊन जुन्या शस्त्रांचा, नाण्यांचा व पत्रांचा अनमोल संग्रह केला आहे.