नदीतल्या जिवांसाठी वाजतेय धोक्याची घंटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:19 AM2021-07-20T04:19:12+5:302021-07-20T04:19:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन नदीत आढळणारे काही मांसाहारी व नदीतील जलचरांना धोकादायक ठरणारे मासे महाराष्ट्रातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन नदीत आढळणारे काही मांसाहारी व नदीतील जलचरांना धोकादायक ठरणारे मासे महाराष्ट्रातील नदीत सापडत आहेत. कोल्हापुरात पंचगंगेत आढळलेला ॲलिगेटर गार आणि पश्चिम महाराष्ट्रातील नद्यांमध्ये संख्येने वाढणारे सकरमाउथ कॅटफिश या माशांनी नद्यांमधील स्थानिक जलीय जिवांसाठी धोक्याची घंटा वाजविली आहे. प्राणी मित्रांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
सांगली, कोल्हापूरमध्ये गेल्या महिनाभरात दोन वेगवेगळे धोकादायक मासे आढळले आहेत. मांसाहारी असलेला सकरमाउथ कॅटफिश हरिपूर (ता. मिरज) येथे जूनमध्ये आढळला होता, तर दोन दिवसांपूूर्वी कोल्हापूरच्या प्रयाग चिखली परिसरात ॲलिगेटर गार हा मांसाहारी व धोकादायक मासा आढळला. हे दोन्ही मासे दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन नदीत वास्तव्यास असणारे आहेत. उत्तर प्रदेशात गंगा नदीत सकरमाउथ मासा आढळल्यानंतर जीवजंतू शास्त्रज्ञांनी त्यांच्या प्रवासाबाबतचे संशोधन केले होते.
वाइल्डलाइफ प्रोटेक्शन अँड रिसर्च सोसायटीच्या संशोधकांनी गेल्या तीन वर्षांपासून याबाबतचा अभ्यास सुरू केला आहे. सोसायटीचे जीवजंतू संशोधक अमित सय्यद यांनी सांगितले की, सकरमाउथचे प्रमाण पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर येथील विविध नद्यांमध्ये वाढत आहे. नीरा नदीमध्ये अनेकदा हे मासे आढळून आले आहेत. नदीच्या तळाशी राहून त्याठिकाणी अन्य माशांची अंडी व अन्य खाद्य खावून हे मासे जगतात. ॲलिगेटर गारसुद्धा येथील नद्यांमध्ये आढळत आहे. तो मोठ्या माशांनाही सहज भक्ष्य बनवू शकतो. त्यामुळे नद्यांमधील स्थानिक जलजीवांसाठी ते धोकादायक ठरू शकतात. नदीतील पर्यावरण व येथील जीवांचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते.
चौकट
कोठून आले हे मासे?
प्राणी मित्रांच्या माहितीप्रमाणे हे मासे मत्स्यालयातून आले आहेत. काचेच्या पेटीत सहसा हे मासे ठेवले जातात. त्यांचा आकार वाढला किंवा जतन करणे शक्य न झाल्याने हे मासे नदी, नाल्यांमध्ये टाकले जातात.
कोट
शासनाने काचेच्या पेट्यांमधील मासे विकणाऱ्यांवर काही बंधने घालणे आवश्यक आहे. स्थानिक जलीय जीवांसाठी हे मासे कसे धोकादायक ठरू शकतात, याबाबत त्यांचे प्रबाेधन करून खरेदी करणाऱ्यांना ते नदी, नाले, वहिरीत टाकण्यापासून प्रतिबंध केला पाहिजे, अन्यथा यावर नियंत्रण मिळविणे कठीण होईल.
- अमित सय्यद, जीवजंतू संशोधक, वाइल्डलाइफ प्रोटेक्शन अँड रिसर्च सोसायटी
कोट
काचेच्या पेटीत हे मासे वापरण्यास परवानगी असली तरी ते नदी, नाले, विहिरीत टाकण्याबाबत संबंधित व्यावसायिकांना, तसेच त्यांच्याकडून खरेदीदारांना रोखले पाहिजे. यामुळे नदीतील जीवजंतूंसाठी ते धोकादायक ठरू शकतात.
- अजित काशीद, प्राणी मित्र सांगली