बालवाडी परिसरात दारूच्या बाटल्या, इंजेक्शनचा खच
By Admin | Published: March 1, 2017 12:29 AM2017-03-01T00:29:30+5:302017-03-01T00:29:30+5:30
बालवाडी परिसरात दारूच्या बाटल्या, इंजेक्शनचा खच
सांगली : शहरातील त्रिकोणी बागेजवळील बालवाडी परिसरात दारूच्या बाटल्या, इंजेक्शनच्या सिरींज आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. स्थायी समिती सभापती संगीता हारगे व नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने या बालवाडीला अचानक भेट दिली असता हा प्रकार उघडकीस आला. सभापतींनी तात्काळ पाहणी करुन या बालवाडी स्वच्छतेचे आदेश दिले आहेत.
त्रिकोणी बागेजवळील ही बालवाडी मुलांच्या संस्कारासाठी कमी आणि विवाह व अन्य समारंभासाठी अधिक उरली आहे. स्वच्छतेसाठी कर्मचारी नाही, की सुरक्षारक्षक नाही. अशी अवस्था या बालवाडीची झाली आहे. या बालवाडीत ७० हून अधिक मुले असून एकच शिक्षिका आहे. बालवाडीच्या परिसरात अस्वच्छता, कचरा, दारूच्या बाटल्यांचा ढीग, इंजेक्शनच्या सिरींज पडल्याचे आढळून आले. या बालवाडीच्या खिडक्यांच्या जाळ्याही गंजून तुटून गेल्या आहेत. बालवाडीच्या मागच्या बाजूस साचलेल्या सांडपाण्यातच दारूच्या बाटल्यांचा खच पडला आहे. या ठिकाणी डासांचे साम्राज्य पसरले आहे. या बालवाडीला कसलीही सुरक्षितता नाही. रात्रीच्यावेळी येथे अवैध व्यवसायही चालत असल्याची धक्कादायक माहिती मिळाली होती.
याबाबत काही नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार केली असता, सभापती संगीता हारगे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सुनीता खोत, नगरसेवक राजू गवळी, युवराज गायकवाड, सुरेखा कांबळे, पद्मिनी जाधव यांनी अचानक बालवाडीस भेट दिली. दारूच्या बाटल्या, इंजेक्शन सिंरीजचा खच, अस्वच्छता पाहून नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. सभापती हारगे यांनी स्वच्छता निरीक्षक याकुब मद्रासी यांना जागेवर बोलावून धारेवर धरले. स्वच्छतेची जबाबदारी कुणाची? असा सवाल त्यांनी केला. या बालवाडीतील शिक्षिकने, याबाबत तक्रार करुनही स्वच्छतेबाबत कसलीही दखल घेतली जात नसल्याचे सभापतींना सांगितले. (प्रतिनिधी)