कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 04:12 PM2019-07-31T16:12:00+5:302019-07-31T16:14:08+5:30
कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाच दिवसापासून पाऊस होत असल्याने कोयना धरणामध्ये 74.89 टी. एम. सी. पाणीसाठा आहे. तसेच वारणा धरणातून 28.90 टी. एम. सी. पाणीसाठा असून 900 क्युसेकस व पंचगंगेतील विसर्ग सोडण्यात येणार आहे.
सांगली : कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाच दिवसापासून पाऊस होत असल्याने कोयना धरणामध्ये 74.89 टी. एम. सी. पाणीसाठा आहे. तसेच वारणा धरणातून 28.90 टी. एम. सी. पाणीसाठा असून 900 क्युसेकस व पंचगंगेतील विसर्ग सोडण्यात येणार आहे.
त्यामुळे धरणातून विसर्ग वाढणार असून कृष्णा नदी पातळीमध्ये सातत्याने वाढ होणार आहे. त्यामुळे नदीकाठाची गावे, वाड्या, वस्त्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षेच्या कारणास्तव नदीपात्रात प्रवेश करू नये. वीज, मोटारी, इंजिने, शेती अवजारे व पशुधन यांच्या सुरक्षेची काळजी घेऊन सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
तसेच सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी यांनी संभाव्य परिस्थिती लक्षात घेता समन्वय ठेवून सतर्क रहावे अशा सूचनाही जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत.
वारणा धरणात 28.89 टी.एम.सी. पाणीसाठा
सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज अखेर 28.89 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
आपल्या शेजारील सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये 74.89 टी.एम.सी इतका पाणीसाठा असून धरणाची साठवण क्षमता 105.25 टी.एम.सी, धोम धरणात 7.77 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 13.50 टी.एम.सी, कन्हेर धरणात 8.12 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 10.10 टी.एम.सी. आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणात 15.93 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 25.40 व राधानगरी धरणात 8.28 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 8.36 टी.एम.सी.आहे. अलमट्टी धरणात 111.31 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 123 टी.एम.सी. असल्याचे जलसंपदा विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
वारणा धरणातून कालवा व विद्युतगृहाव्दारे 900 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे.
- कृष्णा पूल कराड 21.8 (45),
- आयर्विन पूल सांगली 35 (40)
- अंकली पूल हरिपूर 38.9 (45.11).