‘मातोश्री’वरून आले सतर्कतेचे आदेश....स्वतंत्र लढण्याची मानसिकता ठेवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 04:41 PM2019-09-26T16:41:35+5:302019-09-26T16:49:39+5:30
महायुतीसाठी अजूनही वाटाघाटी सुरू असल्या तरी युती तुटण्याचीही भीती व्यक्त होऊ लागल्याने शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवा, सावध रहा, गाफिल राहू नका, असे संदेश राज्यातील सर्व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना दिल्याचे समजते.
सांगली : महायुतीसाठी अजूनही वाटाघाटी सुरू असल्या तरी युती तुटण्याचीही भीती व्यक्त होऊ लागल्याने शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवा, सावध रहा, गाफिल राहू नका, असे संदेश राज्यातील सर्व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना दिल्याचे समजते.
सांगलीत बुधवारी शिवसेनेचे वरिष्ठ नेते व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मेळाव्यातच प्रसंगी स्वतंत्र लढण्याची तयारी करण्याचे आवाहन केले. त्यामुळे शिवसेना नेते युती तुटण्याच्या शक्यतेमुळे सतर्कतेचा संदेश देऊ लागले आहेत.
विधानसभेच्या २0१४ च्या निवडणुकीतही ऐनवेळी चर्चा होऊन युती तुटली होती. त्यावेळी शिवसेना गाफिल राहिल्याने राज्यातील अनेक जागा त्यांना गमवाव्या लागल्या होत्या. मागचा अनुभव गाठीशी असल्याने काहीही होऊ शकते, असाही संदेश नेते देत आहेत. सर्व जागांवर निवडणूक लढण्याची तयारी ठेवावी.
युती झालीच तर त्याचा उपयोग युतीच्या उमेदवारांना होऊ शकतो, मात्र गाफिल राहिल्यानंतर युती तुटली तर नुकसान होऊ शकते, याची चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच राज्यभर विविध नेते त्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांशी बातचीत करीत असल्याचे समजते.
बंडखोरीचीही चिंता
युती झाली तरीही भाजपकडून स्थानिक पातळीवर बंडखोरी करून सेनेच्या काही जागा ताब्यात घेतल्या जाण्याची भिती शिवसेना नेत्यांना आहे. सांगली जिल्ह्यात शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या काही जागांवर भाजपच्या उमेदवारांनी जोरदार तयारी केली आहे. राज्यात अनेक ठिकाणी असे चित्र दिसत असल्याने त्याचीही नोंद वरिष्ठ पातळीवर घेण्यात आली आहे.