जिल्ह्यातील चार तालुक्यात क्षारपडचे प्रमाण वाढले -शेतकऱ्यांमध्ये जागृतीची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 12:00 AM2019-05-29T00:00:47+5:302019-05-29T00:06:44+5:30
उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर होत असल्याने, जमिनीतील मुख्य पोषक तत्त्वेच नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. भविष्यात शेती क्षारपड होण्याची शक्यता दिसत आहे.
सांगली : उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर होत असल्याने, जमिनीतील मुख्य पोषक तत्त्वेच नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. भविष्यात शेती क्षारपड होण्याची शक्यता दिसत आहे. मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर आणि रासायनिक खतांच्या जादा वापरामुळे चार तालुक्यांतील जमीन क्षारपड झाली आहे.
पीक चांगले राहण्याकरिता आता रासायनिक खतांचा भरमसाट वापर करतात. त्यामुळे शेतजमिनीचा पोतच खालावत आहे. सोबतच जमिनीतील अत्यंत सुपीक आणि पोषक तत्त्वे नष्ट होत आहेत. पशुधन घटल्याने शेणखत उपलब्ध होत नाही. त्यामुळेही रासायनिक खतांचा वापर वाढला आहे.शासकीय माती परीक्षण प्रयोगशाळेतर्फे जिल्ह्यातील तीन लाख ११ हजार ११७ शेतकऱ्यांना माती परीक्षण करुन जमिनीच्या आरोग्यपत्रिका दिल्या आहेत. पलूस, वाळवा, मिरज, तासगाव तालुक्यातील जवळपास एक लाखाहून शेतकºयांची एकर जमीन अधिक पाणी आणि रासायनिक खतांच्या जादा वापरामुळे क्षारपड झाली आहे.
आटपाडी, तासगाव, शिराळा, पलूस, मिरज, वाळवा, खानापूर, कवठेमहांकाळ, कडेगाव, जत या दहा तालुक्यातील जमिनीमध्ये नत्र कमी आहे. आटपाडी तालुक्यातील जमिनीमध्ये स्फूरद मध्यम, पालाश भरपूर आणि सेंद्रिय कर्बचे प्रमाण कमी आहे. तासगाव तालुक्यातील जमिनीमध्ये स्फूरद , पालाश भरपूर, तर सेंद्रिय कर्ब मध्यम आहे. शिराळा तालुक्यातील जमिनीमध्ये स्फूरद भरपूर, तर पालाश, सेंद्रिय कर्ब मध्यम आहे. पलूस तालुक्यातील जमिनीमध्ये स्फूरद, पालाश भरपूर, तर सेंद्रिय कर्ब मध्यम आहे.
मिरज तालुक्यातील जमिनीमध्ये स्फूरद, पालाश भरपूर असून सेंद्रिय कर्ब मध्यम आहे. वाळवा तालुक्यात नत्र कमी, तर स्फूरद, पालाश, सेंद्रिय कर्ब भरपूर आहे. खानापूर तालुक्यात स्फूरद भरपूर, तर पालाश, सेंद्रिय कर्ब मध्यम आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील जमिनीमध्ये स्फूरद भरपूर, तर पालाश, सेंद्रिय कर्ब मध्यम आहे. कडेगाव तालुक्यात स्फूरद भरपूर आणि पालाश, सेंद्रिय कर्ब मध्यम आहे, तर जत तालुक्यात स्फूरद मध्यम, पालाश भरपूर व सेंद्रिय कर्ब कमी असल्याचे कृषी अधिकाºयांनी सांगितले.
कीटकनाशक फवारणीमुळे होणारे नुकसान...
शेतकरी रासायनिक खतांचा वापर अधिक प्रमाणात करतात. त्यामुळे सुपीक शेतजमीन आता क्षारपड होण्याच्या मार्गावर आहे. महागड्या कीटकनाशकांचा वापर होऊ लागला आहे. यामुळे उपयोगी वनस्पती व जमिनीतील पोषक तत्त्वे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, असे कृषितज्ज्ञांनी सांगितले आहे.