‘चांदोली’चे चारही दरवाजे खुले - : धरणातून ३४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 11:39 PM2019-08-01T23:39:23+5:302019-08-01T23:40:01+5:30
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागातील चांदोली हे राज्यातील मातीचे दुसऱ्या क्रमांकाचे धरण आहे. सांगली, सातारा व कोल्हापूर या जिल्ह्यांच्या सरहद्दीवर असणाºया धरणाची साठवण क्षमता ३४.४० टीएमसी आहे.
वारणावती : चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सलग चौथ्या दिवशी अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ झाली आहे. त्यामुळे चांदोली धरणाचे चारही वक्राकार दरवाजे गुरुवारी दुपारी सव्वाएक वाजता उघडण्यात आले.
वक्राकार दरवाजातून २५०० व वीजनिर्मितीकडून ९०० क्युसेक असा ३४०० क्युसेक विसर्ग वारणा नदीत सुरू आहे. दरम्यान, नदीकाठच्या गावांनी सावधानता बाळगावी, असा इशारा वारणा पाटबंधारे विभागाने दिला आहे.
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागातील चांदोली हे राज्यातील मातीचे दुसऱ्या क्रमांकाचे धरण आहे. सांगली, सातारा व कोल्हापूर या जिल्ह्यांच्या सरहद्दीवर असणाºया धरणाची साठवण क्षमता ३४.४० टीएमसी आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सध्या अतिवृष्टी व मुसळधार पाऊस सुरू आहे. जुलै महिन्यात १४ वेळा अतिवृष्टी झाली होती. पाणलोट क्षेत्रातून १४६४१ क्युसेक पाण्याची आवक होत असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे.
सोमवारी रात्री १२ वाजता धरणातील पाण्याने सांडवा पातळी पार केली. गुरुवारी दुपारी सव्वाएक वाजता चारही वक्राकार दरवाजे खुले केले आहेत. त्यातून वारणा नदीत २५०० क्युसेक प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गेल्या २४ तासात १२९ मिलिमीटर, तर गुरुवारी दिवसभरात ५५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे व धरणातून सोडण्यात येणाºया पाण्यामुळे वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे.
नदीकाठची पिके पाण्याखाली गेली आहेत. आरळा - शित्तूर व चरण - सोंडोली पुलाच्या कठड्याला घासून पाणी वाहत आहे. कोकरुड - रेठरे बंधारा पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे परिसरातील वाहतूक ठप्प झाली आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे.
दरम्यान, गुरुवारी दुपारी सहायक अभियंता एम. एम. किटवाडकर, शाखाधिकारी टी. एस. धामणकर, रंगराव पाटील, रमेश यादव, बबन कांबळे यांच्याहस्ते धरणाच्या पाण्याचे पूजन करण्यात आले.
पाणीसाठा : वाढला
चांदोली धरण परिसरात गुरुवारअखेर २२६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातील पाण्याची पातळी ६२३.३९ मीटर, तर पाणीसाठा ३०.५३ टीएमसी झाला आहे.
चांदोली धरणाचे वक्राकार दरवाजे गुरुवारी दुपारी उघडल्यानंतर त्यातून फेसाळत बाहेर पडणारे पाणी.