वैद्यकीय अधिकाऱ्यांसह तिघे दोषी
By admin | Published: February 22, 2017 11:22 PM2017-02-22T23:22:18+5:302017-02-22T23:22:18+5:30
रुग्णवाहिकेत प्रसुती प्रकरण : वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अहवाल सादर
सांगली : महापालिकेच्या प्रसुतिगृहातील कर्मचाऱ्यांच्या वादात गर्भवती महिलेची महापालिकेच्या रुग्णवाहिकेतच प्रसुती झाल्याप्रकरणी संबंधित प्रसुतिगृहातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह दोन महिला कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाईची शिफारस चौकशी समितीने आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्याकडे बुधवारी केली.
प्रसुतिगृहातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणाबद्दल स्थायी समितीच्या सभापती संगीता हारगे यांनी संताप व्यक्त केला असून, प्रसुतिगृहातील सर्वच कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याची मागणी आयुक्तांकडे करणार असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
महापालिकेच्या प्रसुतिगृहात प्रसुतीसाठी आलेल्या महिलेची प्रसुती प्रसुतिगृहातील कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकासमक्ष झालेल्या वादावादीत रुग्णवाहिकेतच झाली. ही घटना १८ फेब्रुवारीरोजी घडली. याबाबत प्रसारमाध्यमांतून वृत्त प्रसिध्द होताच आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. यानंतर स्थायी समितीच्या सभापती संगीता हारगे यांनी प्रसुतिगृहातील कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेत याप्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.
या अहवालात प्रसुतिगृहातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटना घडल्याची स्पष्ट कबुली दिली आहे. रेश्मा मुल्ला ही महिला प्रसुतीसाठी सकाळी ९.१५ वाजता प्रसुतीसाठी दाखल झाली होती. संबंधित नर्सनी डॉ. जान्हवी दोरकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी फोनच उचलला नाही. अकरा वाजता आल्यानंतर डॉक्टरांनी रुग्णाची तपासणी केली असता, बाळाने पोटात शौच केल्याचे लक्षात आले. यामुळे बाळास धोका असल्याबाबत संबंधित रूग्णाच्या नातेवाईकास कल्पना देण्यात आली.
त्यांनी ११.१५ वाजता रूग्ण महिलेस शासकीय रूग्णालयात नेण्याची तयारी दर्शवली. सकाळी ११.३० वाजता महापालिकेच्या रुग्णवाहिकेतून महिलेला नेले, सफाई स्टाफने रुग्णवाहिकेसोबत जाण्यावरुन प्रभारी पर्यवेक्षिका मीना लोंढे, सफाई कर्मचारी पूनम ओहर यांच्यात नातेवाईकांसमक्ष वादावादी झाली. यामुळे लोंढे यांनी स्टाफ नर्स छाया मोरे यांना रुग्णाबरोबर जाण्यास सांगितले.
त्यादिवशी शनिवारी आठवडा बाजार असल्याने रूग्णालयाबाहेर गर्दी होती. परिणामी रुग्णवाहिका बाहेर काढण्यास विलंब झाला. काँग्रेस भवननजीक जाताच संबंधित महिलेच्या पोटात दुखू लागले. प्रसुती होणार हे लक्षात येताच संबंधित नर्सने गाडी थांबवायला सांगितली. ११.३७ वाजता महिलेची गाडीतच प्रसुती झाली. रुग्णवाहिका वळवून प्रसुतिगृहाकडे आणण्याची सूचना नर्सने केली. ही बातमी दुसऱ्या दिवशी संपूर्ण शहरात चर्चेची ठरली. (प्रतिनिधी)