corona virus-सांगली जिल्ह्यातील सर्व प्रमुख मंदिरे बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 05:50 PM2020-03-18T17:50:07+5:302020-03-18T17:51:16+5:30
प्रत्येक क्षेत्राला कवेत घेत लोकांना घरीच बंदिस्त करून पाहणाऱ्या कोरोनाने आता भाविकांना देवापासूनही दूर केले आहे. शहरासह जिल्ह्यातील प्रमुख मंदिरांचे दरवाजे मंगळवारपासून बंद झाले असून, पुढील आदेश येईपर्यंत मंदिरे बंदच राहतील, असे संबंधित प्रशासनांनी जाहीर केले आहे.
सांगली : प्रत्येक क्षेत्राला कवेत घेत लोकांना घरीच बंदिस्त करून पाहणाऱ्या कोरोनाने आता भाविकांना देवापासूनही दूर केले आहे. शहरासह जिल्ह्यातील प्रमुख मंदिरांचे दरवाजे मंगळवारपासून बंद झाले असून, पुढील आदेश येईपर्यंत मंदिरे बंदच राहतील, असे संबंधित प्रशासनांनी जाहीर केले आहे.
सांगलीच्या प्रसिद्ध पंचायतन गणपती मंदिराने सांगली व मिरजेतील मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नित्यनियमाने दररोज हजारो भाविक सांगलीच्या गणपती मंदिरात दर्शनासाठी येत असतात.
आता त्यांना देवाचे दर्शन घेण्यासाठी अनिश्चित काळासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. सांगलीसह खानापूर, आटपाडी येथील प्रमुख मंदिरांनीही अनिश्चित काळासाठी दर्शन बंद केले आहे.
तासगाव शहरातील ऐतिहासिक श्री गणपती मंदिरासह आरवडे येथील इस्कॉन मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. तालुक्यातील सर्व सार्वजनिक कार्यक्रम प्रशासनाकडून बंद करण्यात आले असून, सर्व मंगल कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
औदुंबर (ता. पलूस) येथील कृष्णाकाठावर वसलेले श्री दत्त मंदिर श्रींच्या दर्शनासाठी बेमुदत बंद केले आहे. भाविकांच्या तसेच ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी श्री दत्त सेवाभावी ट्रस्टने हे पाऊल उचलले आहे.
भारतासह जगात कोरोना या संसर्गजन्य विषाणू रोगाचा प्रसार मोठ्याप्रमाणात होत आहे. त्याचा प्रसार कमी होण्यासाठी शासनाच्यावतीने विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. शाळा, कॉलेज, मॉल, सिनेमागृह बंद ठेवण्यात आली आहेत. सार्वजनिक ठिकाणी होणारे सभारंभ बंद केले आहेत.
महाराष्ट्रासह कर्नाटक व आंध्र प्रदेशच्या भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या खानापूर तालुक्यातील तीर्थक्षेत्र श्री रेवणसिध्द मंदिर भाविकांना दर्शनासाठी मंगळवारपासून बंद ठेवण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, हे मंदिर दि. ३१ मार्चपर्यंत बंद राहणार असल्याचे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बालाजी गुरव यांनी पत्रकारांना सांगितले.