तासगाव नगरपालिकेत राष्ट्रवादी आशेवर, भिस्त रोहित पाटलांवर; पण..

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 02:00 PM2022-06-22T14:00:46+5:302022-06-22T14:01:31+5:30

तासगाव नगरपालिकेत सत्तेत येण्यासाठी सगळ्याच पक्षांनी ताकद लावली आहे. नेत्यांकडून उमेदवारीची जुळवाजुळव करण्यासाठी सुरुवात केली आहे.

All parties started preparations to come to power in Tasgaon municipality. NCP responsibility is on Rohit Patil | तासगाव नगरपालिकेत राष्ट्रवादी आशेवर, भिस्त रोहित पाटलांवर; पण..

तासगाव नगरपालिकेत राष्ट्रवादी आशेवर, भिस्त रोहित पाटलांवर; पण..

Next

दत्ता पाटील

तासगाव : तासगाव नगरपालिकेत चमत्कार घडवून सत्तेत येण्यासाठी राष्ट्रवादीने तयारी चालविली आहे. इच्छुकांचीदेखील भाऊगर्दी झाली आहे. मात्र, पालिकेत सत्तेत येण्याच्या आशेवर असलेल्या राष्ट्रवादीची सगळी भिस्त युवा नेते रोहित पाटील यांच्यावरच असल्याचे दिसून येत आहे. मात्र, सत्तेत येण्याआधी रोहित पाटील यांना भाजपच्या नेत्यांसोबत ‘अंडरस्टॅण्डिंग’ असल्याच्या चर्चा मोडीत काढण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.

तासगाव नगरपालिकेत सत्तेत येण्यासाठी सगळ्याच पक्षांनी ताकद लावली आहे. नेत्यांकडून उमेदवारीची जुळवाजुळव करण्यासाठी सुरुवात केली आहे. गत निवडणुकीत राष्ट्रवादीला नेतृत्व नसल्याचे चित्र होते. शहरातील प्रस्थापित कारभाऱ्यांनी कातडी बचाव धोरण स्वीकारत रिंगणातून माघार घेतली. राष्ट्रवादीकडून अस्तित्वाची लढाई म्हणून नवख्या उमेदवारांना रिंगणात उतरून कसेबसे लढण्याची वेळ आली. मात्र, त्याही परिस्थितीत राष्ट्रवादीचे आठ उमेदवार विजयी झाले. नगराध्यक्षपदाचा उमेदवार काठावर पराभूत झाला.

पाच वर्षांपूर्वी पराभूत मानसिकेतेनेच निवडणूक लढवली गेली होती. मात्र, आर.आर. पाटील यांची पुण्याई मतदानातून दिसून आली. राष्ट्रवादीची व्होट बँक भक्कम असल्याचे स्पष्ट होऊन देखील गेल्या पाच वर्षांत शहरात ठोस कामगिरी दिसून आली नाही. आठ नगरसेवक असूनदेखील कोणताच प्रभाव दिसला नाही. केवळ स्टंटबाजीच्या पलीकडे नगरसेवक गेले नाहीत. इतकेच नव्हे, तर सत्ताधाऱ्यांवर भ्रष्ट कारभाराचे आरोप होत असतानाच, राष्ट्रवादीच्या कारभाऱ्यांवरदेखील आरोप होत राहिले. त्यामुळे यावेळी नगरपालिका निवडणुकीची सर्व भिस्त रोहित पाटील यांच्यावरच राहणार आहे.

अंडरस्टॅण्डिंगची चर्चा पक्षासाठी अडचणीची

रोहित पाटील यांच्यामुळे कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत सत्तेत येण्याचा चमत्कार झाला. तशीच पुनरावृत्ती तासगाव पालिकेतही दिसून येईल, अशी आशा राष्ट्रवादीला आहे. त्यामुळे जुन्या, नव्या इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. मात्र, कवठेमहांकाळची समीकरणे तासगावला लागू पडणारी नाहीत. तासगाव शहरासह तालुक्यात काही वर्षांपासून अंजनी आणि चिंचणीच्या अंडरस्टॅण्डिंगची चर्चा सातत्याने होत आहे. ही चर्चा राष्ट्रवादीला अडचणीची ठरणारी आहे. रोहित पाटील यांना ही चर्चा मोडीत काढावी लागणार आहे. त्यानंतरच पुढची वाटचाल सुकर होणार आहे.

Web Title: All parties started preparations to come to power in Tasgaon municipality. NCP responsibility is on Rohit Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.