मतदान यंत्राविरोधात सर्वपक्षीय आघाडी
By admin | Published: March 1, 2017 11:54 PM2017-03-01T23:54:44+5:302017-03-01T23:54:44+5:30
मतपत्रिकेद्वारेच मतदान घ्या : आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार
सांगली : राज्यात नुकत्याच झालेल्या महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत मतदान यंत्रातील घोटाळ्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे या झालेल्या निवडणुकीतील मतमोजणीची चौकशी होण्याबरोबरच, यापुढे मतदान यंत्राने मतदान प्रक्रिया पार न पाडता, पूर्वीप्रमाणेच मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची मागणी बुधवारी सर्व पक्षांच्या प्रतिनिधींनी केली. जगातील प्रगत देशांत अजूनही मतपत्रिकेद्वारेच मतदान होत असताना, आपल्या देशातच मतदान यंत्रांचा हट्टाहास का? असा सवालही यावेळी अनेक वक्त्यांनी व्यक्त केला.
नुकत्याच झालेल्या महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीत मतदान यंत्रामुळे घोळ झाल्याच्या अनेक घटना समोर आल्याने, राज्यभर सर्वत्रच मतदान यंत्राद्वारे राबविण्यात येणाऱ्या प्रक्रियेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी जिल्ह्यातील सर्वपक्षीय प्रतिनिधींची बैठक शासकीय विश्रामगृहात झाली. या बैठकीस भाजप वगळता इतर सर्वच राजकीय पक्ष, संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. मोहनराव कदम म्हणाले की, जतमध्येही असा प्रकार घडल्याने मतदान यंत्राद्वारे मतदान घेण्यास आमचा विरोध आहे. पूर्वीप्रमाणेच मतपत्रिकेद्वारेच मतदान घेण्यासाठी पाठपुरावा करणार आहोत.
माजी आ. शरद पाटील म्हणाले की, अमेरिकेसारख्या प्रगत देशातही मतपत्रिकेनेच मतदान घेण्यात येते. आपल्याच देशात मतदान यंत्रांचा वापर करण्यात येतो. ही पध्दत बदलणे गरजेचे असून लोकशाही वाचविण्यासाठी व सर्वसामान्य मतदारांचे हक्क अबाधित राहण्यासाठी मतपत्रिकांचाच वापर व्हायला हवा.
अॅड. अजित सूर्यवंशी म्हणाले की, मतपत्रिकेतून होणाऱ्या मतदानातही घोटाळ्याच्या तक्रारी होत होत्या. पण त्याची व्याप्ती नव्हती. आता मात्र परिस्थिती बदलत आहे. सर्वपक्षीय आघाडीच्या माध्यमातून मतदान यंत्राविरोधात आघाडी करताना न्यायालयाबरोबरच जनतेतही जागृती करणे आवश्यक आहे.
पृथ्वीराज पवार यांनी लढ्याची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, नाशिकमध्ये झालेल्या प्रकारामुळे मतदान यंत्राद्वारे मतदान घेण्याच्या प्रक्रियेवर संशय वाढला आहे. याविषयी अगोदरही तक्रारी आल्या होत्या. मात्र, त्यास गांभीर्याने घेण्यात आले नव्हते. लोकशाही सुदृढ व्हावी यासाठी आता सर्व पक्षांनी एकत्र यायला हवे. न्यायालयीन लढा उभारण्याबरोबरच जनतेतूनही उठाव होणे आवश्यक आहे. याचा पहिला टप्पा म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना गुरूवारी निवेदन देण्यात येणार आहे. यासाठी सर्वसमावेशक आघाडीची स्थापन करणार आहे.
यावेळी कॉँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, महापालिकेचे विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते, वि. द. बर्वे, अय्याज नायकवडी, शेखर माने, मनसेचे तानाजीराव सावंत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे, मदनभाऊ युवा मंचचे अध्यक्ष संतोष पाटील, डॉ. संजय पाटील, अमर पडळकर, किरण कांबळे, सतीश साखळकर, जयदीप भोसले, शशिकांत देठे, अशरफ वांकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)