अमृत योजनेच्या ठेक्यामागे सर्वपक्षीय हात
By admin | Published: July 15, 2017 11:53 PM2017-07-15T23:53:05+5:302017-07-15T23:53:05+5:30
अमित शिंदे : बेकायदेशीर मंजुरीविरोधात लढा उभारणार
लोकमत न्यूज नेटवर्क --सांगली : महापालिकेने मंजूर केलेल्या अमृत योजनेतील मिरज पाणीपुरवठ्याच्या ठेक्यामागे सर्वपक्षीय हात असून, याविरोधात आम्ही लढा उभारणार आहोत, अशी माहिती सांगली जिल्हा सुधार समितीचे अॅड. अमित शिंदे, आर्किटेक्ट रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
शिंदे म्हणाले की, भाजपने या योजनेच्या माध्यमातून ‘सबका साथ, सबका विकास’ हे ब्रीद खरे करून दाखविले आहे. सर्वांनाच त्यांनी योजनेच्या मंजुरीत सोबतीला घेतले आहे. ही योजना नागरिकांच्या कल्याणासाठी आहे की, नगरसेवकांच्या दुकानदारीसाठी आहे, याचा खुलासा शासनाने करावा. कारण नियमबाह्यरित्या जादा दराने आलेल्या निविदेवर शासनानेच शिक्कामोर्तब केले आहे. स्थानिक आमदार आणि खासदारही याबाबत मौन बाळगून आहेत. विरोधी पक्षाचीसुद्धा त्याला साथ आहे. त्यामुळे हा एक सर्वपक्षीय घोटाळा असल्याचेच दिसत आहे. नियमबाह्य कामात झालेला सर्वपक्षीय सहभागच संशयाला बळ देत आहे. योजनेतून नागरिकांचे कल्याणच होणार नाही.
आर्किटेक्ट चव्हाण म्हणाले की, जादा दराने निविदा मंजूर केली असेल तर, कामाचे मूळ अंदाजपत्रक चुकले होते का, याचा खुलासा झाला पाहिजे. योजनेवर अवाढव्य खर्च करताना पाणीपट्टी किती लावण्यात येणार, त्याचा भुर्दंड नागरिकांना बसणार का किंवा कोणत्या आर्थिक गणितावर ही योजना कार्यान्वित होणार, याबाबत कोणताही खुलासा महापालिकेकडून झालेला नाही. जादा दराने निविदा दाखल करताना संबंधित ठेकेदाराने रेट अनालेसिस (दर विश्लेषण) दिले पाहिजे. ते दिलेले नाही. त्यामुळे निश्चितच यामागे आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत, हे दिसून येते. यावेळी प्रा. आर. बी. शिंदे, जयंत जाधव, तानाजी रुईकर, आसिफ मुजावर, नितीन मोरे, रवींद्र ढोबळे, अंकुर तारळेकर, सागर शिंदे, धीरज पोळ, मुकुंद भोरे, कौस्तुभ पोळ, अरुणा शिंदे, प्रा. राणी यादव आदी उपस्थित होते.
खाबूगिरी पॅटर्नमुळे राज्यभर बदनामी
आजवर मिरजेसाठी सर्वच योजना जादा दराने मंजूर झाल्या आहेत. तरीही येथील कामांचा दर्जा निकृष्टच राहिला आहे. महापालिकेच्या तिजोरीतील कोट्यवधी रुपयांचा निधी मिरजेतील विविध विकासकामांवर खर्च होऊनही मिरजेत सर्वप्रकारचे प्रश्न आजही गंभीर अवस्थेत ठाण मांडून आहेत. मिरजेचे नाव नगरसेवकांच्या खाबूगिरी पॅटर्नमुळे बदनाम झाले आहे. परिणामी तिन्ही शहरांच्या बदनामीची चर्चा संपूर्ण राज्यभर सुरू आहे. जनतेला सोबत घेऊन आम्ही याविरोधात लढा पुकारणार आहोत. सर्वप्रकारची आयुधे यासाठी वापरण्याची तयारी केली आहे. कोणत्याही परिस्थितीत अशाप्रकारची बेकायदेशीर कामे आम्ही होऊ देणार नाही, असा इशारा अॅड. शिंदे यांनी यावेळी दिला.