Sangli: शिराळा तालुक्यातील सर्व शाळा झाल्या तंबाखुमुक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 15:30 IST2025-02-10T15:29:58+5:302025-02-10T15:30:18+5:30
ऑनलाइन पद्धतीने प्रमाणपत्र : तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन न करण्याचे समुपदेशन

Sangli: शिराळा तालुक्यातील सर्व शाळा झाल्या तंबाखुमुक्त
शिराळा : शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या एकूण १४७ शाळा, खासगी प्राथमिकच्या १८, माध्यमिकच्या ४९ तर उच्च माध्यमिकच्या ३ अशा २१७ शाळा तंबाखूमुक्त शाळा उपक्रमांतर्गत तंबाखुमुक्त झाल्या आहेत. शासकीय संस्थांसह शाळांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या होणाऱ्या विक्रीमुळे विद्यार्थ्यांना त्याचे व्यसन जडण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने सलाम फाउंडेशन, मुंबई यांच्या सहकार्यातून ''तंबाखूमुक्त शाळा'' हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
शाळांमधूनच देशाची भावी संस्कारक्षम पिढी घडत असते. यासाठीच शालेय शिक्षण, आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने सलाम फाउंडेशन, मुंबई यांच्या सहकार्यातून धूम्रपान, मद्यपान आदी व्यसन प्रवृत्तीपासून ती दूर राहावीत, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. शाळांमध्ये तंबाखूमुक्त शाळा, परिसर उपक्रम राबविला जातोय. शाळा, शाळा परिसर हा तंबाखूमुक्त असावा, यासाठी तंबाखूमुक्त शाळा या उपक्रमांतर्गत प्रत्येक शाळेच्या आवारात जनजागृतीचे फलक लावण्यात आले आहेत.
ज्या शाळा तंबाखूमुक्तीचे ११ निकष पूर्ण करतील, अशा शाळांना तंबाखूमुक्त म्हणून घोषित केले गेले आहे. त्यांना तसे प्रमाणपत्रही ऑनलाइन पद्धतीने दिले गेले आहे. अनेक उपक्रम शाळा स्तरांवर राबवलेत, त्याची जनजागृतीही केली गेली आहे. तालुक्यातील सर्वच शाळांमध्ये तंबाखूजन्य पदार्थ, त्यांचे सेवन नकरणाऱ्यांचे समुपदेशन नुकतेच केले गेले होते.
शालेय जीवनातील विद्यार्थी, महाविद्यालयीन युवकांमध्ये तंबाखू आणि तंबाखूमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची तसेच मौखिक कर्करोगाबद्दल जनजागृती, त्याचा प्रचार, प्रसार करण्यावर विशेषतः तालुक्यातील सर्वच शाळेतील शिक्षकवृंदांनी भर दिला होता. त्यामुळे तालुक्यातील सर्वच शैक्षणिक संस्था तंबाखूमुक्त झाल्या आहेत. - पोपटराव मलगुंडे गटशिक्षणाधिकारी, शिराळा.