जिल्ह्यात सोमवारपासून सर्व दुकाने खुली होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:19 AM2021-07-10T04:19:18+5:302021-07-10T04:19:18+5:30
सांगली : जिल्ह्यातील कोरोनास्थिती अद्यापही कायम असली तरी येत्या सोमवारपासून सर्व व्यवहार दुपारी ४ पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी मिळण्याचे ...
सांगली : जिल्ह्यातील कोरोनास्थिती अद्यापही कायम असली तरी येत्या सोमवारपासून सर्व व्यवहार दुपारी ४ पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी मिळण्याचे संकेत आहेत. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट या आठवड्यात दहा टक्क्यांवर असून, पालकमंत्री जयंत पाटील याबाबत निर्णय घेणार आहेत. दरम्यान, सांगली, सातारा, कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांनी व्हीसीद्वारे संवाद साधत या विषयावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्याचे ठरविले आहे.
राज्य शासनाच्या निर्देशाने पॉझिटिव्हिटी रेटनुसार पाच स्तरातील निर्बंध लागू करण्यात येत आहेत. पंधरवड्यापूर्वी दहा टक्क्यांखाली पॉझिटिव्हिटी रेट आल्याने तिसऱ्या स्तरातील निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यानंतर मात्र, सलग दोन आठवडे १० टक्क्यांपेक्षा अधिक पॉझिटिव्हिटी रेट नोंद झाल्याने अत्यावश्यक सेवावगळता इतर सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत. या आठवड्यातही जिल्ह्यात सरासरी नऊशेवर रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या दोन दिवसांचा अपवादवगळता आठवडाभर दहा टक्क्यांपेक्षा अधिक पॉझिटिव्हिटी रेट कायम आहे.
व्यापारीवर्गातून सर्व व्यवहार सुरू करण्यासाठी वारंवार मागणी होत असल्याने यावर पालकमंत्री पाटील निर्णय घेणार आहेत. सांगलीसह कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातही रुग्णसंख्येतील वाढ कायम असल्याने तिन्ही पालकमंत्र्यांनी या विषयावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्याचा ठरविले आहे. त्यानुसार आज, शनिवारी अथवा रविवारी याबाबत निर्णय होईल. त्यामुळे सोमवारपासून दुपारी ४ पर्यंत सर्व दुकाने, सेवा सुरू ठेवण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे.
कोट
जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट दोन दिवसात कमी आला असून, महापालिका क्षेत्रातही कमी नोंद झाली आहे. तरीही निर्बंध हटविण्याबाबत व इतर नियमांबाबत पालकमंत्री जयंत पाटील निर्णय घेणार आहेत. पालकमंत्र्यांशी चर्चा करून दोन दिवसात निर्णय जाहीर होईल.
- डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी