बी.कॉम.च्या सर्वच प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच झाल्या होत्या व्हायरल, शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षेतील प्रकार 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2023 04:05 PM2023-06-03T16:05:10+5:302023-06-03T16:05:34+5:30

व्हायरल प्रश्नपत्रिका कोणत्या महाविद्यालयातून बाहेर पडली, हे वाॅटरमार्कच्या आधारे शोधणे सहजशक्य आहे, पण त्यासाठी कष्ट घेतले जात नाहीत.

All the question papers of B.Com were viral before the exam, Shivaji University exam type | बी.कॉम.च्या सर्वच प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच झाल्या होत्या व्हायरल, शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षेतील प्रकार 

बी.कॉम.च्या सर्वच प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच झाल्या होत्या व्हायरल, शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षेतील प्रकार 

googlenewsNext

सांगली : शिवाजी विद्यापीठाच्या बी.कॉम. तृतीय वर्षाच्या सर्वच प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर व्हायरल झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शेवटचा पेपर फुटल्याचे कारण देत पुन्हा घेण्यात आला, पण सर्वच विषयांबाबतीत हा धक्कादायक प्रकार घडल्याचे शिक्षकांनी सांगितले.

दि. २५ ते ३१ मे या कालावधीत या परीक्षा झाल्या. दुपारी अडीच वाजता पेपर सुरू व्हायचा, पण ११-१२ वाजताच प्रश्नपत्रिका मोबाइलवर उपलब्ध होत होती. परीक्षेदिवशीच काही विद्यार्थ्यांकडून शिक्षकांना प्रश्नांची उत्तरे विचारण्यात येत होती, त्यावरून प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याचे स्पष्ट झाले. शिक्षकांनी विचारणा केली असता विद्यार्थ्यांनी मोबाइलवर प्रश्नपत्रिका मिळाल्याचे सांगितले. व्हायरल प्रश्नपत्रिका डमी असेल म्हणून काही शिक्षकांनी दुर्लक्ष केले, पण पेपर संपल्यावर तोच पेपर व्हायरल झाला असल्याचे स्पष्ट झाले.

बुधवारी दुपारी अडीच वाजता शेवटचा ॲडव्हान्स अकाउंटन्सी टॅक्सेशनचा पेपर सुरू झाल्यानंतर तासाभराने रद्द करण्यात आला. पेपर फुटल्याने हा निर्णय घ्यावा लागला. नव्या प्रश्नपत्रिकेसह पुन्हा परीक्षा घेण्यात आली. त्यासाठी सायंकाळी साडेपाचपर्यंतचा अतिरिक्त वेळ देण्यात आला. अन्य सर्वच पेपर याच पद्धतीने फुटले होते, पण ते गांभीर्याने घेण्यात आले नाहीत.

अशी असते प्रश्नपत्रिकेची प्रक्रिया

विद्यापीठाकडून प्रत्येक महाविद्यालयाला परीक्षेच्या काही तास अगोदर पीडीएफ स्वरूपात प्रश्नपत्रिका मेलवर दिली जाते. मेल ओपन करण्यासाठी प्राचार्यांकडे कोड दिलेला असतो. त्याआधारे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नजरेखाली प्रश्नपत्रिका डाऊनलोड करून घेतली जाते. जितके परीक्षार्थी, तितक्या प्रिंट काढल्या जातात. कॅमेऱ्यासमोरच पाकिटात सील केल्या जातात. परीक्षेच्या वेळेत संबंधित वर्गांना पाठविल्या जातात.

कसा फुटतो पेपर?

मेलवरून डाऊनलोड करून घेतलेल्या प्रश्नपत्रिकेची प्रिंट काढताना तिला पाय फुटतात. एखाद्या कर्मचाऱ्याकडून मोबाइलवर फोटो काढून व्हायरल केली जाते. प्रश्नपत्रिकेच्या प्रत्येक पानावर त्या-त्या महाविद्यालयाची ओळख सांगणारा वॉटरमार्क असतो. व्हायरल प्रश्नपत्रिका कोणत्या महाविद्यालयातून बाहेर पडली, हे वाॅटरमार्कच्या आधारे शोधणे सहजशक्य आहे, पण त्यासाठी कष्ट घेतले जात नाहीत.

पेपरफुटीचे प्रकार विद्यापीठाकडून गांभीर्याने घेतले जात नसल्याचे दिसते. यामुळे प्रामाणिक आणि हुशार विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना नोकऱ्यांच्या शर्यतीत मागच्या रांगेत उभे केले जाईल. यासंदर्भात कुलगुरूंना निवेदन देणार असून, चौकशीची मागणी करणार आहोत. - रावसाहेब हल्लोळे, अध्यक्ष, काेचिंग क्लासेस टीचर्स असोसिएशन

Web Title: All the question papers of B.Com were viral before the exam, Shivaji University exam type

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.