बांबवडेतील तिन्ही बछड्यांना अखेर बिबट्याच्या मादीने नेले, वनविभागाकडून व्हिडीओ चित्रीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 04:01 PM2023-01-05T16:01:01+5:302023-01-05T16:01:33+5:30
शिराळा : बांबवडे (ता. शिराळा) येथे मंगळवारी बिबट्याची तीन पिल्ले आढळून आली होती. रात्री त्या शेतात ट्रॅप कॅमेरे लावून ...
शिराळा : बांबवडे (ता. शिराळा) येथे मंगळवारी बिबट्याची तीन पिल्ले आढळून आली होती. रात्री त्या शेतात ट्रॅप कॅमेरे लावून तिन्ही पिल्ले सुस्थितीत ठेवण्यात आली होती. मादी बिबट्याने घटनास्थळी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान येऊन एक तासात एकेक करून तिन्ही पिल्ले नेली. या घटनेचे व्हिडीओ चित्रीकरण झाले आहे.
खोलागिरी परिसरातील कारीची पट्टी येथील भानुदास माने यांच्या शेतातील ऊसतोड सुरू होती. मंगळवारी दुपारी तीनच्या दरम्यान ऊसतोड महिलेस बिबट्याचे तीन बछडे दिसले. यावेळी तिने घाबरून आरडाओरडा केला. तेथे उपस्थित नागरिक व ऊसतोड कामगारांनी हे बिबट्याचे बछडे पाहिले व त्वरित शिराळा वनक्षेत्रपाल कार्यालयास कळविले. ऊसतोडही थांबवली.
उपवनसंरक्षक नीता कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल फिरते पथक महंतेश बगले, सहायक वनसंरक्षक डॉ. अजित साजणे, मानद वन्यजीवरक्षक अजितकुमार पाटील, वनरक्षक देवकी ताशीलदार, वनपाल चंद्रकांत देशमुख, प्रकाश पाटील, अमित कुंभार घटनास्थळी दाखल झाले. या पिल्लांची पशुवैद्यकीय अधिकारी सतीशकुमार जाधव व शुभांगी अरगडे यांच्यामार्फत तपासणी केली असता पिल्ले सुस्थितीत असल्याने त्यांना सुरक्षितरीत्या त्याच शेतात ठेवण्यात आले.
बिबट्याची मादी त्याच परिसरात असल्याचा अंदाज असेल व ती बछड्यांना नेण्यासाठी येईल, असा अंदाज बांधून शेतातील नैसर्गिक अधिवासात ट्रेमध्ये हे तिन्ही बछडे ठेवले. या बछड्यांचे वय एक महिन्याच्या आतील असून, यामध्ये दोन नर व एक मादी होते. तेथे दोन कॅमेरे लावण्यात आले. सायंकाळी मादी तेथे आली व साडेसातपासून तासाभरात एकेक करून तिन्ही नेली.