इस्लामपुरात राष्ट्रवादीचे तिन्ही गट एकत्र
By admin | Published: August 26, 2016 12:18 AM2016-08-26T00:18:58+5:302016-08-26T01:15:09+5:30
आज दहीहंडीचे आयोजन : महाडिक युवा शक्तीची सावध भूमिका; शहराचे लक्ष
अशोक पाटील-- इस्लामपूर पालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादीमध्ये तीन गट सक्रिय आहेत. त्यांच्यामध्ये अंतर्गत मतभेद असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. परंतु आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी महाडिक युवा शक्तीला शह देण्यासाठी हे तिन्ही गट एकवटले आहेत. राष्ट्रवादीच्यावतीने यंदा महाडिक युवाशक्तीच्या दहीहंडीपूर्वीच जयंत दहीहंडीचे आयोजन करून आघाडी घेतली आहे. त्यामुळे महाडिक युवा शक्तीने सावध भूमिका घेत राष्ट्रवादीच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केले आहे.
गेल्या तीस वर्षांत पालिकेच्या राजकारणात राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेद अनेकवेळा चव्हाट्यावर आले आहेत. माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांना हे माहीत असतानाही त्यांनी यामध्ये कसलाही हस्तक्षेप न करता सर्व काही आलबेल ठेवले आहे. जरी सत्ताधाऱ्यांमध्ये वाद असले तरी ऐन निवडणुकीच्या काळात पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व एकत्र येऊन विरोधकांना शह देण्यात यशस्वी होतात.
पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांनी कंबर कसली आहे. नुकतेच अंबिका उद्यानाच्या उद्घाटनासाठी सैराट फेम ‘आर्ची’ला आमंत्रित करून गर्दी खेचली होती. या गर्दीचा धसका विरोधकांनी घेतला असतानाच, पुन्हा एकदा महाडिक युवा शक्तीला शह देण्यात राष्ट्रवादी यशस्वी झाली आहे. यापूर्वी महाडिक युवाशक्तीची दहीहंडी प्रथम फुटायची. त्याला शह देण्यासाठी राष्ट्रवादीच्या माध्यमातून जयंत दहीहंडीचे आयोजन करण्यात येत होते. यंदा मात्र महाडिक युवाशक्तीच्या दहीहंडीपूर्वीच राष्ट्रवादीने जयंत दहीहंडीचे आयोजन करून आघाडी घेतली आहे.
महाडिक युवाशक्तीनेही दहीहंडी जोरदार साजरी करण्याचे नियोजन केले होते. यासाठी कार्यकारिणीची निवडही करण्यात आली होती. परंतु दहीहंडी फोडण्यासाठी लावण्यात येणारे गोविंदांचे थर २0 फुटापेक्षा जास्त असू नयेत, या न्यायालयाच्या आदेशामुळे कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे दहीहंडीचे नियोजन ठप्पच झाले. त्यांचे लक्ष आता राष्ट्रवादीच्या दहीहंडीकडे आहे. त्यांना किती प्रतिसाद मिळतो, यावरच महाडिक युवा शक्तीची पावले पडतील.
पालिका निवडणूक चार महिन्यांवर येऊन ठेपली असतानाही विरोधकांत एकी नाही. त्यामुळे महाडिक युवाशक्ती स्वबळावर निवडणूक लढविण्याची भाषा करत आहे. इतरांनीही आपापली ताकद अजमावणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
विरोधकांच्या मोर्चेबांधणीला यश येणार का?
दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी विरोधकांची एकत्रित मोट बांधण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. यात त्यांना कितपत यश मिळणार, हे लवकरच दिसणार आहे.