जयंतरावविरोधात सगळे एकत्र?

By admin | Published: November 11, 2015 10:59 PM2015-11-11T22:59:13+5:302015-11-11T23:38:26+5:30

सर्वपक्षीय आघाडी शक्य : शिवाजीराव नाईक बांधणार मोट

All together against Jayantrao? | जयंतरावविरोधात सगळे एकत्र?

जयंतरावविरोधात सगळे एकत्र?

Next

अशोक पाटील-- इस्लामपूर -वाळवा-शिराळ्यात राष्ट्रवादीचे माजी मंत्री, आ. जयंत पाटील यांच्याविरोधात काँग्रेस, भाजप, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, दलित संघटना, शेतकरी संघटना यांसह एमआयएम आदी पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे. शिवाजीराव नाईक यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा असून, त्यामुळे सर्व छोट्या—मोठ्या विरोधकांची मोट बांधण्याची जबाबदारी त्यांच्यावर येणार आहे.वाळवा-शिराळ्यात सहकारी संस्थांच्या जाळ्यामुळे राष्ट्रवादी पक्ष अधिक मजबूत बनला आहे. राष्ट्रवादीला टक्कर देणाऱ्यांत काँग्रेसचा वाटा मोठा आहे. परंतु या पक्षातील नेत्यांमध्ये मतभेद आहेत. शिराळ्यात शिवाजीराव देशमुख आणि त्यांचे पुत्र सत्यजित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष कार्यरत आहे. परंतु ते सध्या जयंत पाटील यांच्याशी हातमिळवणी करीत आहेत. वाळवा तालुक्यात तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, नानासाहेब महाडिक, सी. बी. पाटील, जितेंद्र पाटील, वैभव पवार हे राष्ट्रवादीच्या विरोधात कार्यरत आहेत. परंतु त्यांच्यामध्ये एकसूत्रता नाही. त्यातील काही नेते स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवाजीराव नाईक यांच्या गटाशी सोयीनुसार साटेलोटे करतात. येथे भाजपचीही ताकद आहे. प्रत्येक निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि काँग्रेसशी हातमिळवणी करीत राष्ट्रवादीला कात्रजचा घाट दाखवला आहे. शिराळा मतदारसंघात शिवसेना नावालाही नाही. केवळ इस्लामपूर शहरापुरती शिवसेना जिवंत आहे. तानाजी सावंत यांच्यारूपाने शिराळा मतदारसंघातील काही गावांत मनसेची धुगधुगी आहे. आरपीआय आणि दलित संघटनांच्या नेत्यांची संख्या मोठी असली तरी, त्यांच्या मागे कार्यकर्त्यांची ताकद अत्यल्प आहे. त्यातच आता एमआयएम पक्षाच्या बांधणीसाठी राष्ट्रवादीतील काही मुस्लिम नेत्यांनी पुढाकार घेतला आहे. परंतु इस्लामपूर शहरातील बहुतांशी मुस्लिम नेत्यांचे हात जयंत पाटील यांच्या वजनाखाली सापडले आहेत.
आमदार शिवाजीराव नाईक यांना कॅबिनेट मंत्रीपद, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांना राज्यमंत्रीपद किंवा त्या दर्जाचे महामंडळ मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे साहजिकच विरोधकांचा आवाज वाढणार आहे. राष्ट्रवादीच्या विरोधातील सर्व छोटे-मोठे पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे. विरोधकांची मोट बांधण्याची जबाबदारी नाईक आणि खोत यांच्यावर येणार आहे.

' गुलाल तिकडं चांगभलं
राष्ट्रवादीच्या समर्थकांची भूमिका नेहमीच आत-बाहेर राहिली आहे. वाळवा तालुक्यात जयंत पाटील, तर शिराळा मतदारसंघात ‘गुलाल तिकडं चांगभलं’ या भूमिकेमुळे राष्ट्रवादीला शिराळा मतदारसंघात फटका बसतो. शिवाजीराव नाईक यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले, तर वाळवा तालुक्यातील ४८ गावांतील राष्ट्रवादीचे बहुतांशी कार्यकर्ते त्यांच्या गोटात जाण्याची शक्यता आहे.

Web Title: All together against Jayantrao?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.