महापालिकेच्या विद्युत साहित्य खरेदीत घोटाळ्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:25 AM2021-01-21T04:25:27+5:302021-01-21T04:25:27+5:30

सांगली : महापालिकेच्या वीजबिलातील घोटाळा गाजत असतानाच बुधवारी महासभेत सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनी विद्युत साहित्य खरेदीतही मोठा घोटाळा झाल्याचा आरोप ...

Allegation of scam in procurement of electrical equipment | महापालिकेच्या विद्युत साहित्य खरेदीत घोटाळ्याचा आरोप

महापालिकेच्या विद्युत साहित्य खरेदीत घोटाळ्याचा आरोप

Next

सांगली : महापालिकेच्या वीजबिलातील घोटाळा गाजत असतानाच बुधवारी महासभेत सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनी विद्युत साहित्य खरेदीतही मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला.

त्यासंदर्भात पुरावे देऊनही अद्याप अहवाल आलेला नाही. वीजबिलापेक्षाही हा मोठा घोटाळा असल्याचा नगरसेवक विजय घाडगे यांनी आरोप केला. सभेत प्रशासनाच्या गैरकारभाराचा पाढाच वाचण्यात आला.महापालिकेच्या विद्युत विभागाचे अभियंता अमर चव्हाण यांचे दोन वर्षांनी दर्शन झाल्याचा टोलाही सदस्यांनी लगाविला.

घाडगे म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत कोट्यवधी रुपयांची साहित्य खरेदी झाली. त्याचा कुठेच ताळमेळ लागत नाही. साहित्याचा दर्जाही निकृष्ट आहे. दोन दिवसांत बल्ब, ट्यूब बंद पडतात. शहर अंधारात आहे. प्रभाग समिती तीनच्या सभेत साहित्य खरेदीत घोटाळ्याचे पुरावे सादर केले होते. त्यासंदर्भात चौकशी अहवाल नाहीत, कागदपत्रेही गायब झाली. विद्युत साहित्य खरेदीची चौकशी केल्यास वीजबिलापेक्षाही मोठा घोटाळा उघडकीस येईल. हा विभाग म्हणजे पोसलेला पांढरा हत्ती असल्याचा आरोप केला. धीरज सूर्यवंशी, संजय मेंढे, अनारकली कुरणे, विष्णू माने, लक्ष्मण नवलाई यांनीही विद्युत विभागाला धारेवर धरले. अभियंता अमर चव्हाण यांनी चार दिवसांत साहित्य पुरवठा होईल असे स्पष्ट केले.

चौकट

मिरज रेल्वेस्थानक नामकरणाचा वाद

मिरज रेल्वे जंक्शनला महात्मा बसवेश्वर यांचे नाव देण्याचा प्रस्ताव पांडुरंग कोरे, संजय मेंढे, संगीता हारगे यांच्यासह काही सदस्यांनी दिला होता. त्याला वहिदा नायकवडी यांनी विरोध केला, तर अप्सरा वायदंडे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्याची मागणी केली. याप्रकरणी सर्वच नावे ठराव करून केंद्र शासनाकडे पाठविला जाईल, असे महापौरांनी सांगितले.

अल्पसंख्याक निधीतून वादंग

अल्पसंख्याक निधीतून शासनाकडून विविध कामांचा प्रस्ताव राष्ट्रवादी गटनेते मैनुद्दीन बागवान, संतोष पाटील यांनी मंजुरीसाठी दिला होता. वहिदा नायकवडी यांच्यासह काही सदस्यांनी या निधीतून डावलल्याचा आरोप केला. त्यावर संतोष पाटील म्हणाले, केंद्र शासनाच्या निधीसाठी आम्ही मुंबईला हेलपाटे घालतो. घरात बसून आयता निधी मिळत नसतो, असा टोला लगावला.

Web Title: Allegation of scam in procurement of electrical equipment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.