युती-महायुतीत लढत रंगणार

By admin | Published: July 14, 2015 11:16 PM2015-07-14T23:16:27+5:302015-07-15T00:43:39+5:30

विटा बाजार समिती निवडणूक : शिवसेनेच्या जुन्या गटाची रिंगणातून माघार

Alliance-Great Dynasty will play in the fight | युती-महायुतीत लढत रंगणार

युती-महायुतीत लढत रंगणार

Next

विटा : खानापूर व कडेगाव तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या विटा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी शिवसेना, भाजप, कॉँग्रेसच्या मोहनराव कदम गटाच्या युतीविरोधात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक व कॉँग्रेसचे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्यासह रिपाइं, शेतकरी संघटना व समतावादी महासंघ यांच्या महायुतीने दंड थोपटले आहेत. १९ जागांसाठी सहा अपक्षांसह ४५ उमेदवार रिंगणात असले तरी, युती व महायुतीतच खरी लढत आहे.
बाजार समितीसाठी ११५ अर्ज दाखल झाले होते. त्यातील ७० उमेदवारांनी माघार घेतली. विद्यमान आमदार अनिल बाबर, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, माजी आमदार व भाजप नेते पृथ्वीराज देशमुख यांच्यात युती झाली आहे, तर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक यांनी माजी आमदार सदाशिवराव पाटील, रिपाइं, शेतकरी संघटना व समतावादी महासंघाला सोबत घेऊन महायुती केली आहे.
मंगळवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्यादिवशी अ‍ॅड. मुळीक यांच्या महायुतीत सहभागी असलेल्या शिवसेनेच्या जुन्या गटाने रिंगणातून माघार घेतली. शिवसेनेचे खानापूर तालुकाप्रमुख संजय विभुते व कडेगाव तालुकाप्रमुख सुभाष मोहिते यांच्या समर्थकांनी अर्ज मागे घेतले. या महायुतीतून अ‍ॅड. मुळीक यांचे सुपुत्र अ‍ॅड. संदीप मुळीक व माजी नगरसेवक सचिन शितोळे मैदानात आहेत.
सोसायटी गटातून ७ जागांसाठी १८ अर्ज राहिले आहेत, तर इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती-भटक्या जमाती, ग्रामपंचायत गट, अनुसूचित जाती-जमाती, हमाल तोलाईदार व कृषी प्रक्रिया खरेदी-विक्री व्यवसाय गटात एकास एक लढत होत आहे. महिला राखीव गटात दोन जागांसाठी ५, तर व्यापारी गटात २ जागांसाठी ६ उमेदवार आहेत. माजी संचालक नथुराम पवार, सुबराव निकम, सुनील मेटकरी वगळता दोन्ही गटांनी नव्या उमेदवारांना संधी दिली आहे. (वार्ताहर)


अनिल बाबर टार्गेट
शिवसेनेच्या जुन्या गटाला सेनेचे विद्यमान आमदार अनिल बाबर यांनी फारसे महत्त्व दिले नाही. त्यामुळे जुन्या पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांनी आ. बाबर यांना प्रसिध्दीपत्रकाव्दारे टार्गेट केले आहे. खानापूर तालुकाप्रमुख संजय विभुते व कडेगाव तालुकाप्रमुख सुभाष मोहिते यांनी प्रसिध्दीपत्रक काढले आहे. आ. बाबर यांनी जुन्या शिवसैनिकांना सोबत घेऊन न जाता भ्रमनिरास केला आहे. जुन्या शिवसैनिकांना सामावून घेण्याबाबत वरिष्ठांकडून संपर्क साधला असता, आ. बाबर यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे नवा व जुना गट असा वाद नको म्हणून आम्ही बिनशर्त माघार घेत असून, तटस्थ राहणार असल्याचे विभुते व मोहिते यांनी सांगितले.

Web Title: Alliance-Great Dynasty will play in the fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.