आघाडीचा पराभव होईल: चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 12:04 AM2019-04-09T00:04:32+5:302019-04-09T00:04:37+5:30
सांगली : बारामती, माढा, हातकणंगलेसह पश्चिम महाराष्टÑातील सर्व जागांवर युती विजयी होणार असून, आघाडीचा पराभव निश्चित आहे. महाराष्टÑात ४८ ...
सांगली : बारामती, माढा, हातकणंगलेसह पश्चिम महाराष्टÑातील सर्व जागांवर युती विजयी होणार असून, आघाडीचा पराभव निश्चित आहे. महाराष्टÑात ४८ पैकी ४५ जागा आम्हाला मिळतील, असा दावा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना केला. दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या रूपाने आपला शिष्य मोठा होत असल्याबद्दल शरद पवारांना दु:ख वाटत आहे, अशी टीकाही केली.
चंद्रकांत पाटील म्हणाले , बरेच कायदे आम्हाला करायचे असल्यामुळे देशभरात दोन तृतीयांश जागा मिळविणे हे आमचे उद्दिष्ट आहे. सध्याच्या परिस्थितीत आम्हाला काही कायदे करताना अडचणी येत असल्याने उद्दिष्टपूर्ती झाल्यास बरेच कायदे आम्ही या देशात आणू शकतो. सध्या पन्नास टक्क्यांवर हे कायदे करता येत नाहीत. एका एजन्सीने युतीला ३७५ जागा मिळतील, असे सांगितले आहे. त्यामुळे आमचे ध्येय या माध्यमातून पूर्ण करू शकतो. बारामती, माढा, हातकणंगलेत आघाडीच्या उमेदवारांचा पराभव निश्चित आहे. ज्यांनी आपल्याला काहीतरी शिकविले त्यांना गुरूस्थानी मानावे, ही आपली भारतीय संस्कृती आहे. त्याचदृष्टीने मोदींनी शरद पवारांना गुरू म्हटले होते. कोणत्याही गुरूला शिष्य आपल्यापेक्षा मोठा झाल्याचा आनंद होत असतो, मात्र शरद पवारांना त्याचे दु:ख होत आहे. हे त्यांच्या मूळ स्वभावाच्या विरुद्ध आहे. मी त्यांना आदरस्थानी मानतो, पण ते असे का वागत आहेत, हे कळत नाही.
सांगलीत लढत रंगतदार... मला येथे यावे लागले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, सांगली लोकसभा मतदारसंघातील निवडणूक सुरुवातीला इतकी एकतर्फी वाटत होती की, मला याठिकाणी यावे लागणार नाही, असे वाटत होते, मात्र फिल्मी स्टाईलने येथील लढत रंगतदार स्थितीत पोहोचली. लढतसुद्धा रंगतदार झाली पाहिजे. आता तशी दिसत आहे. त्यामुळे मला येथे यावे लागले.
वसंतदादा गटाने अपक्ष लढायला हवे होते!
वसंतदादांच्या वारसदारांनी दुसऱ्या पक्षामार्फत निवडणूक लढविणे हे लोकांना फारसे रूचलेले नाही. दादा गट म्हणून निवडणूक लढविताना पूर्वी एक शान होती. त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढविली असती, तर कदाचित लोकांनी त्यांना सहानुभूती दाखविली असती, असे मत चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
देशाच्या सुरक्षिततेसाठी निवडणूक महत्त्वाची
देशाची सुरक्षा कोणता पक्ष करणार, कोणामध्ये ती कुवत आहे, याचा विचार करायला लावणारी ही निवडणूक आहे. सुरक्षेच्या विषयावर भाजपनेच सर्वाधिक काम केले आहे. त्यामुळे देशाच्या सुरक्षिततेसाठी जनता पुन्हा भाजपला साथ देईल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
सुप्रिया सुळे यांचा पराभव निश्चित
सुप्रिया सुळे यांचा लोकसभा निवडणुकीतील पराभव निश्चित आहे. किती मताने त्यांचा पराभव होणार, हे येत्या पंधरा दिवसात स्पष्ट होईल. त्यामुळे शरद पवारांना त्यांच्या मुलीसाठी अधिक वेळ द्यावा लागणार आहे. उरलेल्या उमेदवारांना ते नंतर वेळ देतील, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.
राज ठाकरे आघाडीला चांगले कसे म्हणत आहेत?
राज ठाकरे यांच्या भूमिकेबद्दल पाटील म्हणाले की, ते माझे चांगले मित्र आहेत. चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट अशी त्यांची भूमिका असते. तरीही मला त्यांना असा प्रश्न विचारायचा आहे की, आयुष्यभर ज्या कॉँग्रेस-राष्टÑवादीला आपण नावे ठेवण्याचे काम केले, त्याच आघाडीला आता ते चांगले कसे म्हणत आहेत?