आईच्या बाराव्याला रोपांचे वाटप
By admin | Published: April 30, 2017 01:10 AM2017-04-30T01:10:39+5:302017-04-30T01:10:39+5:30
स्तुत्य उपक्रम : नागदेववाडीच्या दिवसे कुटुंबीयांचा इतरांसमोर आदर्श
कोल्हापूर : नागदेववाडी (ता. करवीर) येथील संजय गांधी निराधार पेन्शन योजना समितीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र दिवसे यांनी आईच्या बाराव्या दिवसाच्या विधीनिमित्त पारंपरिक भांडीवाटपाला फाटा देत रोपांचे वाटप केले. दिवसे कुटुंबीयांनी हा स्तुत्य उपक्रम सुरू करून इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
राजेंद्र दिवसे यांच्या आई अर्चना अशोक दिवसे यांचे १८ एप्रिल रोजी निधन झाले. ‘अर्चनावहिनी’ म्हणून त्या साऱ्या गावाला परिचित होत्या. त्यांच्या मनमिळावू, अडचणीतील प्रत्येकासाठी नेहमी मदतीचा हात देणाऱ्या स्वभावामुळे त्यांच्या आकस्मिक जाण्याने साऱ्या गावावर शोककळा पसरली होती. या कुटुंबीयांनी आपल्या स्वभावातून इतका गोतावळा निर्माण केला आहे की, गेले बारा दिवस सांत्वनासाठी अक्षरश: रीघ लागली होती. शनिवारी बाराव्याचा विधी केला. मृताच्या स्मृती चिरंतन राहाव्यात म्हणून बाराव्या दिवशी पै-पाहुण्यांना भांड्यांचे वाटप करण्याची गावात फार जुनी परंपरा आहे; पण तिला फाटा देत राजेंद्र दिवसे यांनी बाराव्यासाठी येणाऱ्या पै-पाहुण्यांना रोपांचे वाटप करून वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला. ४०० हून अधिक रोपांचे वाटप करीत असताना त्यांचे जतन करण्याची विनंतीही ते पाहुण्यांना करीत होते. पंचायत समितीचे सदस्य मोहन पाटील यांच्या हस्ते रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य योगेश ढेंगे, अशोक दिवसे, पोपट दिवसे, मधुकर दिवसे, जयवंत दिवसे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
नागदेववाडी (ता. करवीर) येथील राजेंद्र दिवसे यांनी आईच्या बाराव्यानिमित्त रोपांचे वाटप केले. यावेळी मोहन पाटील, अशोक दिवसे, पोपट दिवसे, मधुकर दिवसे, जयवंत दिवसे उपस्थित होते.