लाँड्री व्यावसायिकांना परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:26 AM2021-04-21T04:26:42+5:302021-04-21T04:26:42+5:30
सांगली : राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवरी संचारबंदी लागू केली आहे. यामध्ये लाँड्री व्यवसायावर निर्बंध आल्यामुळे सर्व व्यावसायिक व कुटुंबीयांवर ...
सांगली : राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवरी संचारबंदी लागू केली आहे. यामध्ये लाँड्री व्यवसायावर निर्बंध आल्यामुळे सर्व व्यावसायिक व कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली. त्यामुळे शासनाने व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अन्यथा मासिक १५ हजार रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी राष्ट्रसंत गाडगेबाबा लाँड्री असोसिएशनने केली आहे.
याबाबत संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, कोरोना महामारीच्या काळात शासनाने लाँड्री व्यवसायाकडे अगोदरच दुर्लक्ष केले आहे. तशातच पुन्हा संचारबंदी लागू करून निर्बंध आणले आहेत. त्यामुळे लाँड्री व्यवसाय पूर्णपणे थांबला आहे. लाँड्री व्यावसायिक आणि त्यांच्यावर अवलंबून असलेले कुटुंबीय यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. केवळ जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील लाँड्री व्यावसायिक व परीट समाज होरपळून निघाला आहे.
राज्यात त्यांची संख्या लाखोच्या घरात आहे. त्यांची उपासमार होत असल्यामुळे लाँड्री व्यवसाय एकतर अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करून व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी, अन्यथा मासिक १५ हजार रुपये अनुदान द्यावे, असेही निवेदनात म्हटले आहे. परीट समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष संताजी शिंदे, शहर अध्यक्ष दत्तात्रय बन्ने, लाँड्री संघटनेचे अध्यक्ष गोपाल पवार, उपाध्यक्ष सागर देवरूखकर, माधव साळुंखे, विलास गायकवाड, संजय पवार, धनंजय गाडगीळ, चंदू पवार, बन्सी कदम, धनाजी कदम, आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.