शिवजयंती कार्यक्रमांसाठी परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:49 AM2021-02-18T04:49:30+5:302021-02-18T04:49:30+5:30
संख : सरकारने यावर्षी गर्दीचे कारण देऊन ‘शिवजयंती’ कार्यक्रमाला घातलेली बंदी तत्काळ मागे घ्यावी व सरसकट परवानगी द्यावी, ...
संख : सरकारने यावर्षी गर्दीचे कारण देऊन ‘शिवजयंती’ कार्यक्रमाला घातलेली बंदी तत्काळ मागे घ्यावी व सरसकट परवानगी द्यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष श्रेयश नाईक यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मुंबईला बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमाला मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या स्वागतासाठी व मंत्री धनंजय मुंडे यांच्या स्वागताला परळी येथे हजारोंच्या संख्येने लोक आले होते. मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर संवाद दौरा चालू आहे. पदवीधर व ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. भाजपचे राष्ट्रीय नेते महाराष्ट्र, पश्चिम बंगालसह देशभर फिरत आहेत. मुख्यमंत्र्यांना हे कसे चालते?
पोलीस त्यांना परवानगी देतात. मात्र, शिवजयंतीच्या कार्यक्रमावर बंदी घातली जाते. शिवजयंतीच्या कार्यक्रमातून समाज प्रबोधनाचे कार्यक्रम, शाहिरी, पोवाडे, व्याख्यान, रक्तदान शिबिर कार्यक्रमातून समता, समानता आणि बंधुता प्रस्थापित केली जाते. सरकारने बंदी तत्काळ मागे घेऊन शिवजयंतीच्या कार्यक्रमाला सरसकट परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.