शहरातील दुकाने उघडण्यास परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:17 AM2021-07-09T04:17:36+5:302021-07-09T04:17:36+5:30
सांगली : महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हिटी दर ६.४१ टक्के इतका आहे; तर १६०७ ऑक्सिजन बेड शिल्लक आहेत. त्यामुळे ...
सांगली : महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हिटी दर ६.४१ टक्के इतका आहे; तर १६०७ ऑक्सिजन बेड शिल्लक आहेत. त्यामुळे शहरातील सर्व व्यवहार सुरू करावेत, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी गुरुवारी पत्रकार बैठकीत केली.
पाटील म्हणाले की, कोरोनाच्या दुस-या लाटेत शहरात रुग्णांची संख्या कमी असताना शासनाच्या आदेशाचे पालन करीत व्यापार्यांनी दुकाने बंद ठेवली. जून महिन्यात जिल्ह्याचा चौथ्या टप्प्यात समावेश झाला. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू करण्यास मुभा देण्यात आली. आताही रुग्णवाढीचा दर कमी असताना दुकाने बंद आहेत.
महापालिका क्षेत्रातील आरटीपीसीआर चाचण्यांच्याआधारे आलेल्या पॉझिटिव्हिटी दरानुसार निर्बंध लावण्यासाठी ‘स्वतंत्र घटक म्हणून घोषित करावा, अशी मागणी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे. कोल्हापूर महापालिका क्षेत्रातील कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर ९.०९ टक्के असून, शिल्लक ऑक्सिजन बेड ४५५ आहेत. तरीही त्याठिकाणी व्यापार सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्या धर्तीवर सांगलीबाबतही निर्णय व्हावा.
दुकाने बंद असल्यामुळे अनेक व्यापा-यांचा माल ख़राब झाला आहे. सर्व व्यावसायिक आर्थिक अडचणीत आहेत. व्यापा-यांना लाईट बिल, पाणीपट्टी, जीएसटी, घरफाळा, विम्याचे हप्ते, व्यवसाय परवाना, प्रोफेशनल टॅक्स व शासनाचे इतर सर्व कराचे ओझे वाढत आहे, असेही पाटील म्हणाले.