काही वेळासाठी तरी व्यापाराला परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:27 AM2021-05-10T04:27:21+5:302021-05-10T04:27:21+5:30
सांगली : येत्या १५ मेनंतर लॉकडाऊन न वाढवता जरूर त्या कडक उपाययोजना करून काही वेळासाठी तरी व्यापार सुरू करण्यास ...
सांगली : येत्या १५ मेनंतर लॉकडाऊन न वाढवता जरूर त्या कडक उपाययोजना करून काही वेळासाठी तरी व्यापार सुरू करण्यास मुभा द्यावी, अशी मागणी व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी मुख्यमंत्र्यांकडे एका पत्राद्वारे केली आहे.
शहा यांनी पत्रात म्हटले आहे की, मे महिन्याचा उर्वरित १५ दिवस राहिलेला सीझन तरी व्यावसायिक दृष्टीने व्यापारी बांधवांना मिळाला तर निदान खर्च, बँकेचे व्याज, हप्ते, कर्मचारी पगार या बाबतींत नियोजन करता येईल. व्यापारी समाजावर मोठे आर्थिक अरिष्ट आले आहे. त्यात जर लॉकडाऊन पुन्हा वाढला तर बाजारपेठ पूर्णतः संपुष्टात येईल. कोरोनाचा प्रादुर्भाव मोठा आहे, याबाबत दुमत नाही; पण कुठंतरी यासोबत जगण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना अंगीकारून ठप्प झालेले अर्थचक्र नियमित करणे क्रमप्राप्त आहे.
सांगलीत २०१९ मध्ये आलेल्या भयंकर महापुरामुळे आधीच याठिकाणचा व्यापार अडचणीत आला आहे. त्यातून अजून आम्ही सावरलो नाही तोपर्यंत सतत लॉकडाऊनला सामोरे जात आहोत. कोणतीही दिलासादायक ठोस मदत केंद्र, राज्य शासन किंवा स्थानिक प्रशासनाकडून आम्हाला मिळालेली नाही. कोणत्याही प्रकारे वित्तीय संस्थांकडून दिलासा मिळालेला नाही. स्थानिक पातळीवर साधी घरपट्टी-पाणीपट्टीसुद्धा माफ झाली नाही. अशा परिस्थितीत इथले व्यापारी बांधव हतबल आहेत. स्थानिक परिस्थिती पाहून आम्ही व्यापार सुरू करण्याबाबत अनेक उपाययोजना सुचवू शकतो. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने असोसिएशनला विश्वासात घेऊन निदान शहराअंतर्गत व्यापार सुरू ठेवण्यासाठी तरी मार्ग काढावा, अशी मागणी केली आहे.