बदाम १०५०, तर अंजीर १००० रुपयांवर, अफगाणिस्तानात नाकेबंदीने ड्रायफ्रूट महागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:31 AM2021-08-20T04:31:29+5:302021-08-20T04:31:29+5:30
संतोष भिसे- लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा मिळवताच भारतीयांनाही वेगवेगळ्या मार्गांनी त्याचे चटके बसू लागले आहेत. ...
संतोष भिसे- लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा मिळवताच भारतीयांनाही वेगवेगळ्या मार्गांनी त्याचे चटके बसू लागले आहेत. ड्रायफ्रूटसची भाववाढ त्यापैकीच एक. अफगाणिस्तानातून भारतात बदाम, अंजीर, खजूर व मनुक्यांची मोठी आयात होते. यातील बदामाचे भाव पंधरा दिवसांत २५ टक्क्यांनी वाढले आहेत.
घाऊक बाजारात एक किलो बदाम १ हजार ५० रुपयांनी विकला जात आहे. ही दरवाढ अभूतपूर्व असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. पिस्ता, जर्दाळू, खिसमिस यांचीही २५ टक्क्यांनी भाववाढ झाली आहे. श्रावणापासून सण-उत्सव सुरू होताच ड्रायफ्रूटसची मागणी प्रचंड वाढते. याच काळात अफगाणिस्तानात संघर्ष सुरू झाल्याने आवक थांबली आहे. रस्ते नसल्याने ड्रायफ्रूटस अफगाणिस्तानबाहेर काढणे तेथील निर्यातदारांना मुश्कील झाले आहे. त्याची झळ सांगलीतील व्यापाऱ्यांनाही जाणवत आहे. काहींनी जुना माल काढला असला तरी त्याला दर्जाही नाही.
बॉक्स
स्टॉक संपेपर्यंतच विक्री
- अफगाणिस्तानमध्ये टोकाच्या संघर्षाचा अंदाज नसल्याने व्यापाऱ्यांनी ड्रायफ्रूटसचा पुरेसा साठा केला नाही.
- मुंबई व दिल्लीतून स्थानिक व्यापारी ड्रायफ्रूटस खरेदी करतात, पण तेथेही पुरेसा साठा नाही.
- सणासुदीच्या दिवसांमुळे व्यापाऱ्यांचे डोळे अफगाणिस्तानचे दरवाजे खुले होण्याकडे लागले आहेत.
ड्रायफ्रूटसची दरवाढ अशी (प्रतिकिलो भाव)
तणावापूर्वीचे भाव सध्याचे भाव
बदाम ५८० १०४०
मनुका ३२० ३६०
अंजीर ८०० १०००
कोट
दिवाळीपर्यंत दरवाढ कायम राहील
ड्रायफ्रूटसची इतकी प्रचंड दरवाढ प्रथमच दिसत आहे. मुंबई, दिल्लीतील आयातदार अफगाणिस्तानमधील निर्यातदारांशी संपर्क ठेवून आहेत. तणाव निवळून मालाचा पुरवठा पूर्ववत होण्यास आणखी महिनाभर लागण्याची शक्यता आहे. दिवाळीपर्यंत दरवाढ कायम राहण्याचा अंदाज आहे.
- रवीकांत ठक्कर, ड्रायफ्रूट व्यापारी
घाऊक बाजारात स्टॉक असला तरी तो महिन्याभरच पुरणार आहे. तोपर्यंत अफगाणिस्तानातून आयात सुरू झाली नाही तर दर आणखी वाढू शकतील. सध्या उपलब्ध साठ्यातून विक्री सुरू आहे. अंजीर, मनुक्याला अफगाणिस्तानशिवाय पर्याय नाही.
- गोविंद कोरे, ड्रायफ्रूट व्यापारी.