राज्यात महाआघाडी साथ-साथ, जिल्ह्यात तिन्ही पक्षांची पाठीला पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:29 AM2021-08-13T04:29:36+5:302021-08-13T04:29:36+5:30
सांगली : तीन पक्षांच्या महाविकास आघाडीची गाडी राज्यात सत्तेत असली तरी जिल्हास्तरावर त्यांच्यात बिघाडी सुरु आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचा ...
सांगली : तीन पक्षांच्या महाविकास आघाडीची गाडी राज्यात सत्तेत असली तरी जिल्हास्तरावर त्यांच्यात बिघाडी सुरु आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचा विचार केला तर अपवाद वगळता सर्वत्र तिन्ही पक्षांची पाठीला पाठ आहे.
सोयीच्या आघाड्या, सोयीची धोरणे घेऊन तिन्ही पक्षांच्या ग्रामपंचायती, पंचायत समिती, नगरपालिका, महापालिका अशा सर्वप्रकारच्या संस्थांमधील वाटा वेगवेगळ्या आहेत. ज्याठिकाणी महाविकास आघाडी म्हणून एकत्र येण्याचा प्रयत्न या तिन्ही पक्षांनी केला, तिथेही ते फसले आहेत. महाविकास आघाडीच्या घरातले भांडण, तंटे मिटण्याची काेणतीही चिन्हे नाहीत. एकमेकांच्या वर्चस्ववादावरुन रुसवा-फुगवीचा खेळही रंगला आहे.
चौकट
पंचायत समित्यांमध्येही बिघाडी
जिल्ह्यातील १० पंचायत समित्यांपैकी ६ भाजपच्या ताब्यात आहेत. महाविकास आघाडीचे वर्चस्व कमी असले तरी अपवाद वगळता अनेक ठिकाणी भाजप व राष्ट्रवादीचे, भाजप व शिवसेना, भाजप व काॅंग्रेसचे साटेलोटे आहे. त्यामुळे बहुतांश पंचायत समितींमध्ये महाविकास आघाडीतील मित्रपक्षांचे सूर वेगवेगळे आहेत.
चौकट
जिल्हा परिषदेत महायुती सत्तेत
सांगली जिल्हा परिषदेत परंपरागत युती व आघाडी अस्तित्वात आहे. भाजप व शिवसेना सत्तेत आहे तर विरोधात राष्ट्रवादी व काँग्रेस आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी याठिकाणी अस्तित्वात नाही.
चौकट
महापालिकेत छुपा संघर्ष कायम
सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेत भाजपला सत्तेवरुन खाली खेचण्यात काँग्रेस-राष्ट्रवादीला यश आले असले तरी दोन्ही पक्षांमधील छुपा संघर्ष कायम आहे. त्यात दिवसेंदिवस वाढ होत आह. राष्ट्रवादीचा वर्चस्ववाद काँग्रेसला मान्य नाही.
चौकट
नियोजन समितीच्या निवडीवरुन ठिणगी
जिल्हा नियोजन समितीच्या निवडीत पालकमंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचे ९ व शिवसेना, काँग्रेसचे प्रत्येक ३ सदस्य निवडले आहेत. दोन्ही मित्रपक्षांना राष्ट्रवादीने योग्य स्थान दिले नाही, म्हणून वाद सुरु आहे. शिवसेनेने याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. राष्ट्रवादीकडूनही हा वाद सामोपचाराने मिटविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
कोट
संवाद नसल्याने जिल्ह्यातील महाविकास आघाडीत वाद आहेत. पालकमंत्री म्हणून जयंत पाटील यांनी समन्वय राखून मनाचा मोठेपणा दाखवायला हवा. मित्रपक्षाचे खच्चीकरण होत असेल तर सूर जुळणार कसे?
- संजय विभुते, जिल्हाप्रमुख, शिवसेना
कोट
वरिष्ठ पातळीवर महाविकास आघाडीची जी धोरणे ठरतात, त्याची अंमलबजावणी जिल्ह्यात होत असते. घर म्हटल्यावर भांड्याला भांडे लागणार, पण आम्ही एकत्र आहोत. त्यामुळे काही गोष्टींवरील मतभेदही दूर होतील.
- अविनाश पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी
कोट
जिल्ह्यात महाविकास आघाडी एकत्रच आहे. काही कारणाने मतभेद निर्माण झाले असतील तर ते दूर होतील. निश्चितपणे तिन्ही पक्ष समन्वयाने काम करण्यास तयार आहेत.
- पृथ्वीराज पाटील, शहर जिल्हाध्यक्ष, काँग्रेस