कृष्णेच्या पुरासोबत मगर, सापांचाही शहरात शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:24 AM2021-07-26T04:24:37+5:302021-07-26T04:24:37+5:30
सांगली : शहरात शिरलेल्या कृष्णेच्या पाण्यासोबत जलचरही येऊ लागले आहेत. वाळव्यात शनिवारी मगरीने गावात प्रवेश केला, तर सांगलीत अनेक ...
सांगली : शहरात शिरलेल्या कृष्णेच्या पाण्यासोबत जलचरही येऊ लागले आहेत. वाळव्यात शनिवारी मगरीने गावात प्रवेश केला, तर सांगलीत अनेक भागात सापांचा वावर वाढला आहे.
दत्तनगरमध्ये पुराच्या पाण्यात पोहणारी मगर रहिवाशांना पहायला मिळाली. सुमारे सहा फूट लांबीची मगर काही वेळांनी पुराच्या पाण्यात निघून गेली. वाळव्यातील मळीभागात रस्त्यावर आलेल्या भल्यामोठ्या मगरीचे छायाचित्रण मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. कसबे डिग्रज, सांगलीवाडी, सांगलीतील शामरावनगर, काकानगर, कर्नाळ रस्ता आदी भागांत जलचरांनी पाण्यासोबत रहिवाशी वसाहतींत प्रवेश केला आहे. विस्तारित भागातील अनेक बंगल्यांना पाण्याने वेढले आहे. वरच्या मजल्यावर राहिलेल्या रहिवाशांना पाण्यासोबत बंगल्यात शिरणाऱ्या सापांवर लक्ष ठेवावे लागत आहे. दरवाजे बंद असले तरी खिडक्या, गॅलरीमधून साप येत आहेत. शामरावनगरमध्ये सर्रास रहिवाशांनी पुरापूर्वीच घरे रिकामी केले आहेत. तेथे आता सापांचा वावर सुरू झाला आहे. काही ठिकाणी सर्पमित्रांनी सापांना पकडून परत पाण्यात सोडले.
कृष्णेच्या पाण्यात मगरींचा वावर पूर्वीपासूनच आहे. आता पुराचे पाणी पात्राबाहेर पडल्याने त्यासोबत मगरीही येऊ लागल्या आहेत. विशेषत: मगरीची छोटी पिल्ली रहिवासी वसाहतीत आढळत आहेत. रहिवाशांसाठी हे भीतीदायक अनुभव आहेत. पूर ओसरल्यावर घरात प्रवेश करण्यापूर्वी रहिवाशांना या जलचरांची खबरदारी घ्यावी लागणार आहे.