रत्नागिरी-सोलापूर महामार्गालगत जमिनीला आला ‘भाव’, व्यवसायासाठी अतिक्रमणे फोफावली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 02:48 PM2024-01-11T14:48:31+5:302024-01-11T14:48:46+5:30
अतिक्रमणामुळे विस्तारीकरणात अडथळे
सांगली : रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर व्यावसायिकांनीही आपले बस्तान बसवायला सुरुवात केली आहे. रस्त्याच्या दुतर्फा व्यापारी उदीम वाढू लागल्याने जमिनींना सोन्याचा भाव आला आहे. त्यातून अतिक्रमणेही फोफावू लागली आहेत. ती तातडीने काढून घेण्याचे आदेश महामार्ग प्राधिकरणाने दिले आहेत.
महामार्गाच्या दुतर्फा जणू पैशांचे मळे फुलू लागले आहेत. मिरज ते सोलापूरदरम्यान ठिकठिकाणी हॉटेल्स, लॉजिंग, चहा टपऱ्या, गॅरेज आदी व्यवसाय सुरू झाले आहेत. याचा लाभ उठविण्यासाठी लगतच्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी भाडेपट्ट्याने देण्यास सुरुवात केली आहे. जमिनीच्या रुंदीवर भाड्याचा दर ठरत आहे. मागे शेतात मात्र कितीही अंतरापर्यंत वापर करता येऊ शकतो, पण भाडेपट्ट्याचे भाव भलतेच चढे आहेत. त्यामुळे अतिक्रमणेही फोफावू लागली आहेत.
महामार्गाचे काँक्रिटीकरण संपल्यानंतरही दोन्ही बाजूंना काही अंतरापर्यंत महामार्ग प्राधिकरणाची हद्द आहे. तेथे वाहतुकीचा रस्ता नसला, तरी सुरक्षिततेसाठी जागा ठेवण्यात आली आहे. याच ठिकाणी अतिक्रमणे होत असल्याचे आढळले आहे. विशेषत: प्राधिकरणाच्या सोलापूर कार्यालयाच्या अधिकार क्षेत्रामधील हद्दीत लगतच्या मिळकतधारकांनी अनधिकृतपणे अतिक्रमण केले असल्याचे प्राधिकरणाच्या निदर्शनास आले आहे. कच्च्या स्वरूपाची बांधकामेही केली आहेत. ही अतिक्रमणे स्वखर्चाने काढून घ्यावीत, अशी नोटीस प्राधिकरणाने बजावली आहे.
अतिक्रमणामुळे विस्तारीकरणात अडथळे
राष्ट्रीय महामार्ग नियंत्रण (जमीन आणि वाहतूक) अधिनियमानुसार नोटिसांची कार्यवाही करण्यात आली आहे. नोटिसीत म्हटले आहे की, या अतिक्रमणामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ मधील बोरगाव ते वाटंबरे सेक्शनमध्ये रस्ता विस्तारीकरणाच्या कामात अडथळे येत आहेत. रस्त्याच्या मध्यापासून उजव्या व डाव्या बाजूस रस्त्याच्या हद्दीपर्यंत अनधिकृत अतिक्रमण व विनापरवाना बांधकाम केले आहे. ते स्वखर्चाने त्वरित काढून घ्यावे.
मिळकतधारकांनी अतिक्रमण काढून घेतले नाही, तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सोलापूर विभागातर्फे हटविण्यात येईल. त्याचा खर्च व दंड त्यांच्याकडून वसूल करण्यात येईल. - एस. एस. कदम, उपमहासंचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सोलापूर विभाग.