ॲपेक्सप्रकरणी नार्को चाचणीलाही तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:19 AM2021-07-02T04:19:18+5:302021-07-02T04:19:18+5:30

सांगली : ॲपेक्स रुग्णालयप्रकरणी सातत्याने महापालिकेवर आरोप होत आहे. सध्या आम्ही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी करीत आहोत. कोरोनाची लाट ...

Also ready for narco test in Apex case | ॲपेक्सप्रकरणी नार्को चाचणीलाही तयार

ॲपेक्सप्रकरणी नार्को चाचणीलाही तयार

googlenewsNext

सांगली : ॲपेक्स रुग्णालयप्रकरणी सातत्याने महापालिकेवर आरोप होत आहे. सध्या आम्ही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी करीत आहोत. कोरोनाची लाट ओसरताच संबंधितांना कायदेशीर उत्तर देऊ. या प्रकरणात केवळ सीआयडी चौकशीच नव्हे, तर नार्को चाचणीलाही आपण तयार असल्याचे प्रत्युत्तर आयुक्त नितीन कापडणीस यांनी गुरुवारी दिले.

मिरजेतील ॲपेक्स रुग्णालयातील ८७ रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी डाॅ. महेश जाधवसह दहा जणांना अटक करण्यात आली आहे. या रुग्णालयाला कोविड सेंटरची परवानगी महापालिकेने दिली होती. त्यावरून बराच गदारोळ उडाला आहे. शिवसेना, भाजपसह काही जणांनी सातत्याने महापालिकेवर टीकाटिपणी सुरू ठेवली आहे.

त्याबाबत कापडणीस म्हणाले की, कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोना रुग्णांना बेडची कमतरता भासत होती. शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अनेक रुग्णालये अधिगृहित करण्यात आली. बाॅम्बे नर्सिंग ॲक्टमधील रुग्णालयांना कोविड हाॅस्पिटल म्हणून परवानगी दिली. या परवानग्या देताना सर्व नियमांचे पालन केले आहे. परीक्षण समितीनेही ॲपेक्सला तीनदा भेट देऊन पाहणी केली. त्याचा अहवाल महापालिकेला दिला नाही. तो नियंत्रण कक्षाला देण्यात आला. त्यापैकी ७ मेच्या अहवालात रुग्णालयातील मृत्यूदर अधिक असल्याचा उल्लेख आहे. पण महापालिकेने तत्पूर्वीच हे रुग्णालय सील केले होते. सुरुवातीला रुग्णांची बिले, नातेवाईकांशी उद्धट वर्तनाच्या तक्रारी आल्या. आपण स्वत: रुग्णालयात जाऊन पाहणी केली. नातेवाईकांशी संवाद साधला. रुग्णालयात अनेक त्रुटी दिसून आल्या. त्यात सुधारणा करण्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली. या मुदतीत रुग्णालयातील सुविधांबाबत काहीच सुधारणा न झाल्याने कोविड हाॅस्पिटलचा परवाना रद्द केला. त्यानंतरही रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली. तातडीने आरोग्याधिकाऱ्यांनी छापा टाकून हे रुग्णालय सील केले. महापालिकेच्यावतीनेच पहिला गुन्हा दाखल केला होता. तरीही महापालिकेवरच आरोप सुरू आहेत. आम्ही सीआयडी चौकशीच नव्हे, तर नार्को चाचणीला तयार आहोत. सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी सुरू आहे. वातावरण शांत झाल्यानंतर कायदेशीर उत्तरही देऊ, असेही कापडणीस म्हणाले.

Web Title: Also ready for narco test in Apex case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.