‘आयर्विन’चा पर्यायी पूल लिंगायत स्मशानभूमीपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:23 AM2021-01-17T04:23:42+5:302021-01-17T04:23:42+5:30
सांगली : आयर्विन पुलाला पर्याय म्हणून नवा पूल उभारण्याबाबत अनेक वाद झाल्यानंतर आता महापालिकेने विकास आराखड्यात तरतूद केलेल्या पुलासाठी ...
सांगली : आयर्विन पुलाला पर्याय म्हणून नवा पूल उभारण्याबाबत अनेक वाद झाल्यानंतर आता महापालिकेने विकास आराखड्यात तरतूद केलेल्या पुलासाठी भूसंपादन व आनुषंगिक प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले आहेत. लिंगायत स्मशानभूमीपासून सांगलीवाडीपर्यंत या पुलाचा मार्ग आहे.
आयर्विन पुलावरील अवजड वाहतूक बंद केली आहे. या पुलाची वयोमर्यादा पाहून त्यास बायपास पूल यापूर्वीच उभारला गेला आहे. मात्र, तो शहराबाहेरून असल्याने अनेकांकडून तो शहरातून व्हावा, अशी मागणी केली गेली. शहराला वळसा घालून वाहनांना जावे लागत असल्याने तो फारसा उपयोगी पडत नसल्याचे अनेकांचे मत आहे. त्यामुळे आ. सुधीर गाडगीळ यांनी आयर्विन पुलाजवळच पांजरपोळ येथून सांगलीवाडीच्या क्रीडांगणातून नव्या पुलाचा प्रस्ताव शासनाकडून मंजूर करून घेतला होता. शहरातील व्यापाऱ्यांनी त्यास विरोध केल्यानंतर गेल्या अनेक महिन्यांपासून त्याविषयी वादविवाद सुरू आहे.
अखेर महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी महापालिकेच्या विकास आराखड्यातील प्रस्तावित पुलासाठी अधिकाऱ्यांचे पथक स्थापन केले. विकास आराखड्यातील तरतुदीनुसार सांगलीवाडीतून हा रस्ता नदीतील बंधाऱ्यापलीकडून हरिपूर रोडवरील लिंगायत स्मशानभूमीजवळून शंभरफुटी रस्त्याला जाऊन मिळणार आहे. त्यामुळे या पुलासाठी व रस्त्यासाठी बाधित होणाऱ्या मालमत्तांची तपासणी, आवश्यकतेनुसार भूसंपादन करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. यासाठी सहायक आयुक्त दत्तात्रय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली चार जणांचे पथक नियुक्त केले आहे. त्यात नगररचनाकार शिवप्रसाद धुपकर, सहायक नगररचनाकार प्रतीक डोळे, कनिष्ठ अभियंता कलीम धावडे, शाहबाज शेख यांचा समावेश आहे. या पथकास कार्यवाही करून तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
चौकट
राष्ट्रीय महामार्गात समाविष्ट
पेठ, सांगली, मिरज, म्हैसाळ हा राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ मध्ये येतो. याच मार्गात हा पूल समाविष्ट आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने २० ऑक्टोबर रोजी महापालिकेला त्यांच्या हद्दीतील या कामाबाबतचे पत्र दिले होते. त्यानुसार ही कार्यवाही सुरू आहे.
कोट
सांगलीतील व्यापाऱ्यांच्या मागणीची दखल घेत आयर्विनलगत होणारा पूल रद्द करून विकास आराखड्यानुसार तो होत आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. व्यापारी पेठा यामुळे सुरक्षित राहतील. नव्या पुलामुळे व महामार्गामुळे बाजारपेठा व शहराचा विकास होईल.
-शेखर माने, नेते, शिवसेना