सांगली महापालिकेत सत्ता राष्ट्रवादीची, कारभार मात्र भाजपचा हाती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2022 04:21 PM2022-10-26T16:21:41+5:302022-10-26T16:22:10+5:30

महापौरांना भाजपचा आधार घेऊन पालिकेचा गाडा हाकण्याची वेळ

Although the mayor of Sangli Municipal Corporation belongs to NCP, BJP is in charge at present | सांगली महापालिकेत सत्ता राष्ट्रवादीची, कारभार मात्र भाजपचा हाती

सांगली महापालिकेत सत्ता राष्ट्रवादीची, कारभार मात्र भाजपचा हाती

googlenewsNext

शीतल पाटील

सांगली : महापालिकेत महापौर राष्ट्रवादीचा असला तरी सध्या कारभार मात्र भाजपच्या सल्ला सुरू आहे. राज्यातील सत्ताबदलाचा हा परिपाक मानला जात असला खुद्द महापौर दिग्विजय सूर्यवंशी पक्षात एकाकी पडले आहेत. सहकारी पक्ष काँग्रेसने त्यांची साथ सोडली आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवकही त्यांच्या पाठीशी नाहीत. त्यामुळे महापौरांना भाजपचा आधार घेऊन पालिकेचा गाडा हाकण्याची वेळ आली आहे.

गेल्या चार वर्षांत महापालिकेच्या राजकारणात अनेक स्थित्यंतरे आली. बहुमत असलेल्या भाजपला महापालिकेचा कारभारात स्वपक्षातील नेत्यांनी आव्हाने निर्माण केली. त्यातच पारदर्शी कारभारासाठी कोअर कमिटी तयार करण्यात आली आहे. पदाच्या पालख्या या कोअर कमिटीच्या नातलगाकडेच देण्यात आल्या. त्यामुळे अडीच वर्षांत भाजपमध्ये धुसफूस सुरू झाली. त्यात राज्यात महाआघाडीचे सरकार सत्तेवर असल्याने त्याचा पुरेपूर फायदा राष्ट्रवादीने उचलला. सव्वा वर्षांपूर्वी भाजपमधील २० ते २२ नगरसेवक फुटून राष्ट्रवादीत जातील, अशी स्थिती निर्माण झाली होती.

महापौर, उपमहापौर निवडीवेळी सात जण फुटले आणि बहुमतातील भाजपवर विरोधात बसण्याची वेळ आली. काँग्रेसची सदस्यसंख्या जादा असतानाही राजकीय दबावतंत्रांचा वापर करीत राष्ट्रवादीने महापौरपद खेचून आणले. त्यानंतर सव्वा वर्षे महापालिकेच्या पटलावर राष्ट्रवादीचा दबदबा होता. शहर जिल्हाध्यक्षांसह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची पालिकेत उठबैस वाढली होती. प्रशासनावर त्यांचा वरचष्मा होता. पण राज्यात सत्ताबदल झाला अन् महापालिकेतील राजकीय चित्रही बदलले.

महापौरांच्या मागे सातत्याने असलेली राष्ट्रवादी नगरसेवकांची फळी बाजूला झाली. सभागृहात महापौरांना घेरले जात असताना ना राष्ट्रवादीचे सदस्य मदतीला येत होते, ना काँग्रेसचे. सत्ताबदलामुळे भाजपलाही नवसंजीवनी मिळाल्याने त्यांचे नगरसेवक आक्रमक झाले आहेत. स्वपक्षात एकाकी पडलेल्या महापौरांनी कारभाराची दिशाच बदलत आता भाजप नेत्यांचा सल्ला घेण्यास सुरुवात केली आहे.

भाजपचे नेते शेखर इनामदार, स्थायी सभापती धीरज सूर्यवंशी यांच्याशी जुळवून घेतले आहे. महासभेत भाजपचा सल्ला घेऊन निर्णय होत आहेत. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे नगरसेवक आणखीन दुखावले आहेत. गत महासभेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनीच महापौरांवर हल्लाबोल केला, तर काँग्रेसच्या मनोज सरगर यांनी महापौरांचा राजीनामा मागितला. नगरसचिवांवर राष्ट्रवादीचे नगरसेवक टीकाटिप्पणी करीत असताना महापौरांच्या मदतीला भाजपचे नगरसेवक धावून आले. महापौर राष्ट्रवादीचा असला तरी सत्तेची दोरी भाजपच्या हाती असल्याचे चित्र आहे.

एक किस्सा असा...

काँग्रेसच्या एका नगरसेवकाला महासभेत एका विषयावर ठराव करून हवा होता. त्याने महापौरांशी चर्चा केली. त्यांना विषय समजून सांगितला. पण महापौरांनी त्याला शेखर इनामदार यांना भेटण्याचा सल्ला दिला. तो नगरसेवक इनामदार यांच्याकडे गेला. त्याने विषय सांगताच इतर भाजपच्या नगरसेवकांनी ठरावाला विरोध केला. भाजपचा विरोध असल्याचे पाहून महापौरांनी त्या नगरसेवकाला दूरच ठेवणे पसंत केले. यावरून महापालिकेत पुन्हा भाजपचाच वरचष्मा असल्याचे दिसून येते.

Web Title: Although the mayor of Sangli Municipal Corporation belongs to NCP, BJP is in charge at present

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.