कृषी प्रक्रिया उद्योगांच्या वाढीकडे नेहमीच दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 11:31 PM2019-04-09T23:31:55+5:302019-04-09T23:32:01+5:30
सांगली : द्राक्ष, डाळिंब, टॉमेटो, ऊस, दुग्धोत्पादनासोबत मोठ्या प्रमाणावर होणारे कुक्कुटपालन ही सांगली जिल्ह्याची ओळख आहे. अन्नाची नासाडी टाळण्यासाठी ...
सांगली : द्राक्ष, डाळिंब, टॉमेटो, ऊस, दुग्धोत्पादनासोबत मोठ्या प्रमाणावर होणारे कुक्कुटपालन ही सांगली जिल्ह्याची ओळख आहे. अन्नाची नासाडी टाळण्यासाठी तसेच प्रक्रिया उद्योगास चालना देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी म्हणावे तेवढे प्रयत्न न केल्यामुळेच मोठे कृषी प्रक्रिया उद्योग जिल्ह्यात उभे राहिले नाहीत. उद्योग भवनकडे मात्र जिल्ह्यात ३५०० कृषी प्रक्रिया उद्योग सुरू असल्याची नोंद आहे.
उद्योगास चालना देण्यासाठी राज्य पुरस्कृत ‘मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना’ आणि केंद्र पुरस्कृत ‘प्रधानमंत्री किसान संपदा योजना’ लागू केल्या आहेत. प्रत्यक्षात या योजनांचे अनुदान लोकप्रतिनिधींचे कार्यकर्तेच लाटत आहेत.
योजना चांगल्या असूनही लाभार्थींना अनुदानच वेळेवर मिळत नसल्यामुळे कृषी प्रक्रिया उद्योग उभारणीत अडचणी असल्याचे नवीन उद्योजकांनी सांगितले. उत्पादित मालास योग्य बाजारपेठही उपलब्ध नाही.
आतापर्यंत काय झाले उपाय?
1ड्रायपोर्ट हे कृषी मालाच्या निर्यातीसाठी उपयुक्त ठरणारे आहे. ते रेल्वे, रस्ते व सागरी मार्ग जोडण्याचे काम करते. रांजणी (ता. कवठेमहांकाळ) येथे ड्रायपोर्टची खा. संजयकाका पाटील यांनी घोषणा केली. पण, त्याची अंमलबजावणी झालीच नाही.
2 सहकारी कृषी प्रक्रिया उद्योग उभे राहिले. पण, ढिसाळ व्यवस्थापन आणि भ्रष्ट राज्यकर्त्यांमुळे ते उद्योग बंद पडले आहेत.
3 कृषी प्रक्रिया उद्योग सुरु होत आहेत. या नवीन उद्योजकांना मार्केटिंगचा अनुभव नसल्यामुळेही ते बंद पडत आहेत.
तज्ज्ञांना काय अपेक्षित आहे?
1जिल्ह्यात कृषी प्रक्रिया उद्योग केंद्र आणि राज्य शासनाने स्वत: पुढाकार घेऊन वाढविण्याची गरज आहे. तरच शेतीचा विकास होण्यास मदत होईल.
2कृषी प्रक्रिया उद्योग वाढविण्यासाठी शासनाने वीज, जागा मोफत उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. तरच हे उद्योग वाढतील आणि टिकतील सुध्दा.
3अनुदान देऊन कृषी प्रक्रिया उद्योग वाढणार नाहीत, तर ते वाढविण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने किमान दहा वर्षाचे धोरण आखण्याची गरज आहे. करामध्ये सवलत आणि आंतराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याची गरज आहे.