सौंदळ स्थानकाचा आग्रह कायमच
By admin | Published: December 2, 2014 10:47 PM2014-12-02T22:47:36+5:302014-12-02T23:31:46+5:30
राजापूर परिसर : कोकण रेल्वेकडे पूर्व परिसराचे गाऱ्हाणे
राजापूर : कोकण रेल्वेने सातत्याने अन्याय केलेल्या सौंदळ स्थानकाच्या निर्मितीसाठी आता तालुक्याचा पूर्व परिसर एकवटला आहे. दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या एका बैठकीत सौंदळ स्थानक मार्गी लागले पाहिजे, असा जोरदार आवाज उठवताना रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंची भेट घेण्याचा निर्धार करण्यात आला.
येळवण येथे प्रा. चंद्रकांत देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत परिसरातील सुमारे १५ ते ३९ हून अधिक गावांतील ग्रामस्थ उपस्थित होते. कोणत्याही परिस्थितीत सौंदळचे स्थानक मार्गी लागले पाहिजे, अशी जोरदार मागणी सर्वांनी केली.
यापूर्वी सौंदळचे नियोजित स्थानक राजकीय कुरघोडीत अखेरच्या क्षणी रद्द झाले होते. सोल्ये गावी तालुक्याचे स्थानक मार्गी लागले होते. त्यानंतर कोकण रेल्वे प्रशासनाने आपल्या मार्गावर एक-दोन नवीन स्थानक मंजूर केली असून, अजून काही स्थानके प्रस्थापित आहेत. मात्र, सौंदळबाबत काहीच हालचाल नाही. माजी खासदार नीलेश राणे हे यापूर्वी पाचल दौऱ्यावर आले असता सौंदळ स्थानक तांत्रिक कारणास्तव नाकारण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली होती. त्यामुळे सौंदळ स्थानकाचा प्रश्न अधांतरी लटकत राहिलेला आहे. मात्र, आता सुरेश प्रभूंकडे रेल्वेमंत्रीपद आले आहे, त्यामुळे सौंदळ स्थानकाच्या प्रश्नासह सर्वसामान्य जनतेच्या सोयीसाठी एखादी नवीन लोकल गाडी सुरू करावी, अशीही मागणी करण्यात येणार आहे.
यापूर्वी सौंदळ स्थानकाच्या मागणीसाठी चंद्रकांत देशपांडे यांनी पुन्हा एकदा पुढाकार घेताना दोन दिवसांपूर्वी येळवण गावी याच विषयासाठी खास बैठक आयोजित केली होती. त्यावेळी पूर्व परिसरातील सुमारे ८० ते ९० नागरिक उपस्थित होते. कोणत्याही परिस्थितीत सौंदळमधील रेल्वे स्थानकाचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे. तसेच कोकणातून आणखी एक लोकल गाडी मुंबईसाठी सुरू करावी. त्यासाठी व्यापक स्वरुपात आंदोलने करु, असा निर्धार व्यक्त करण्यात आला. सुदैवाने रेल्वे मंत्रीपद हे आपल्या कोकणकडे आहे. त्याचा वापर केला पाहिजे. यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला. ही पहिली बैठक असून, यापुढे ३ तारखेला ओझर व ४ तारखेला पाचल व ताम्हाने या पंचायत समिती गणाच्या होणाऱ्या बैठकीत ध्येयधोरण व दिशा ठरवली जाणार आहे. सौंदळ रेल्वे स्थानक मार्गी लावण्यासाठी राजापूर तालुक्याचा मध्य-पूर्व विभाग एकटवला असून, केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू याप्रकरणी कोणती भूमिका घेतात, याकडे तालुक्यातील सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)